Wednesday, 6 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.12.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****
** बोंडअळी तसंच तुडतुड्यांमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश
** राज्यशासनाचं महिला उद्योग धोरण जाहीर;
** भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन
** लातूर जिल्ह्यात डिसेंबरअखेर उघड्यावर शौचापासून मुक्त न होणाऱ्या गावांच्या सरपंचांवर कारवाईचा इशारा
आणि
** दिल्ली कसोटीत काल चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात तीन बाद ३१ धावा
****
****
बोंडअळी तसंच तुडतुडे यांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश राज्य मंत्रिमंडळानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळींचा आणि धान पिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव झाल्याच्या तक्रारी आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये रोग आणि किडींचा प्रादूर्भावही समाविष्ट असल्यानं, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून देण्यात येणाऱ्या मदतीस शेतकरी पात्र ठरू शकतात, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षाच्या निकषात हे नुकसान बसलं नाही तर राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
****
राज्यशासनाचं महिला उद्योग धोरण काल जाहीर करण्यात आलं, राज्यात महिला परिचालित उद्योगांचं प्रमाण नऊ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत नेणं हा या धोरणाचा उद्देश असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितलं. या धोरणानुसार नवीन पात्र सुक्ष्म, लघु तसंच मध्यम उपक्रमांना, तालुका वर्गीकरणानुसार २० लाख ते १०० लाख रुपये मर्यादेपर्यंत भांडवली अनुदान देण्यात येईल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या उद्योगांना वीजेच्या प्रत्येक युनिटमागे दोन रुपये तर इतर जिल्ह्यातल्या उद्योगांना एक रुपये सवलत देण्यात येईल. व्याजदरात सवलत, प्रदर्शनासाठी प्रोत्साहनासह इतरही अनेक सुविधा या धोरणात आहेत. शंभर टक्के भागभांडवल असलेली तसंच किमान पन्नास टक्के महिला कामगार असलेली कंपनी या सुविधांसाठी पात्र ठरणार आहे.
****
रास्तभाव दुकानांमार्फत स्वस्त दराने तूरडाळ विक्रीला काल कुलाबा इथं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रारंभ झाला. प्रतिकिलो ५५ रुपये दराने ही डाळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
*****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. यासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात बोलत होते. आतापर्यत १७ लाख ४९ हजार शेतकऱ्यांसाठीचे १० हजार ३३२ कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून, पडताळणीनंतर ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार १४१ कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
****
ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्यात बहुतांश ठिकाणी जाणवत असून, मुंबईसह अनेक जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धुळे, नंदुरबार, सातारा, तसंच औरंगाबाद शहरातही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नितीन आगे हत्या प्रकरणात अहमदनगर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या खटल्यातल्या १३ फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नाशिक इथल्या घोटी परिसरात काळी जादू तथा नरबळी प्रकरणातली आरोपी बच्चीबाईसह अकरा आरोपींना काल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निकाल दिला.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि इतरांच्या वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत सांताक्रूज इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी यावेळी शशी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. शशी कपूर यांचं सोमवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.
****
आकाशवाणी दिल्ली केंद्राचे माजी वृत्तनिवेदक डॉ गोपाळ मिरीकर यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते १९६२ ते ७२ या काळात दिल्ली इथं वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. १९७५ ते ८५ या काळात त्यांनी आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर म्हणूनही काम केलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं जात आहे, यानिमित्त आंबेडकरांच्या जीवनाची सचित्र माहिती देणाऱ्या एका पुस्तिकेचं प्रकाशन काल मुंबई इथं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्यासंख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत.
औरंगाबादसह मराठवाड्यात आज ठिकठिकाणी अभिवादन सभांसह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ विचारवंत डॉ महेश भारतीय यांचं आज सकाळी साडे दहा वाजता व्याख्यान होणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर युवा मंचच्यावतीनं काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह एकशे दोन जणांनी रक्तदान केलं. मराठवाड्यात सर्वत्र अभिवादन सभा, संदेश फेरीसह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जागतिक मृदा दिवस काल पाळण्यात आला. यानिमित्तानं ठिकठिकाणी मृदा आरोग्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम, तसंच मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं.
लातूर इथं मांजरा कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं, माती परीक्षण प्रयोगशाळांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातही तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना शेतजमिनींचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती पाणी परीक्षणाची शपथ देण्यात आली.
जालना जिल्ह्यातल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात आयोजित मेळाव्यात कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी, माती परीक्षण करूनच जमिनीच्या सुपीकतेनुसार पिकांचं नियोजन करावं, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित मेळाव्यात, कृषीतज्ज्ञांनी उपस्थितांना तंत्रशुध्द शेतीबाबत मार्गदर्शन केलं.
****
स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांची मानसिकता आणि सवयी बदलण्यासाठी प्रशासनानं काम करावं असं आवाहन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात आतापर्यंत १५ जिल्ह्यातले १९८ तालुके आणि ३१ हजार १७२ गावं उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातली जी गावं ३१ डिसेंबरअखेर उघड्यावर शौचापासून मुक्त होणार नाहीत, अशा गावांच्या सरपंचासह सर्व जबाबदारांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. ३१ डिसेंबरनंतर शौचालय नसल्यास, कुठलेही प्रमाणपत्र, रेशनवरील धान्यासह इतर शासकीय लाभ तसंच गावांना विकास निधी मंजूर केला जाणार नसल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****
जालना जिल्हा परिषदेतला कनिष्ठ सहाय्यक लिपिक रानबा भाग्यवंत याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ अटक केली. सेवानिवृत्त आरोग्य सेविकेच्या रजा रोखीकरणाचं देयक अदा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या संघानाईक तांडा इथल्या सरपंचाचा पती प्रेमदास राठोड याला तीन हजार रुपये लाच स्वीकारतांना लाचलूचपत विभागाच्या पथकानं अटक केली. रोहयो अंतर्गत विहीर खोदकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट कार्य करणारे १८ ग्रामसेवक आणि स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त १० ग्रामपंचायतींना काल जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गावातल्या राजकारणात ग्रामसेवकांनी भाग न घेता सर्वांना सोबत घेऊन विकास घडवण्याचं आवाहन देवयानी डोणगांवकर यांनी केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात तीन बाद ३१ धावा झाल्या. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २४६ धावांवर घोषित केला. शिखर धवननं ६७, विराट कोहली आणि रोहीत शर्मानं प्रत्येकी ५० आणि चेतेश्वर पुजारानं ४९ धावा केल्या. सामन्यात श्रीलंका ३७८ धावांनी पिछाडीवर आहे.
*****

No comments:

Post a Comment