आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१३ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
कोळसा खाण वाटप प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, माजी कोळसा
सचिव एच सी गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बासू यांना दिल्लीच्या विशेष
न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. दोषींना याप्रकरणी उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
****
२००१ मध्ये संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सोळा वर्षं
झाली. या हल्ल्यात राज्यसभा सुरक्षा सेवेचे दोन कर्मचारी, दिल्ली पोलिसांचे पाच जवान
आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक महिला कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. संसद भवन
परिसरातल्या हुतात्मा स्मारकावर आज श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली
अर्पण केली आहे. तिरस्कार आणि दहशतवादानं भारतीय लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न
केला होता, मात्र त्यांना यश मिळालं नसल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे. या हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या वीर जवानांच्या शौर्याला देश नमन करत असल्याचं
गृहमंत्र्यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत गेल्या पाच वर्षात १५ कोटी
७९ लाख प्रवाशांची घट झाली असून, महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली असल्याची माहिती परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांनी काल विधानपरिषदेत दिली. महामंडळाचा संचित तोटा दोन हजार
३१२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
१० नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
किनवट आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतींचा यात समावेश आहे. बीडमधल्या
अंबाजोगाई आणि परभणीतल्या जिंतूर नगरपरिषदेच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी
देखील आज मतदान होत आहे. दरम्यान, मतदान होत
असलेल्या सर्व ठिकाणी आज सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतमोजणी उद्या होणार
आहे.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना आज पंजाबमध्ये मोहाली इथं होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता सामन्याला सुरुवात
होईल.
*****
No comments:
Post a Comment