Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** बँक खात्याला आधार आणि पॅन क्रमांक जोडण्याची मुदत
३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
** विधीमंडळात तिसऱ्या दिवशीही कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्ष आक्रमक
** औरंगाबादमधल्या गॅस्ट्रो प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आल्यास
कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
आणि
** दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर
१४१ धावांनी दणदणीत विजय; रोहित शर्माचं द्विशतक
****
केंद्र सरकारने बँक खात्याला आधार आणि
पॅन क्रमांक जोडण्याची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आधार क्रमांक, पॅन किंवा फॉर्म ६० जमा करण्याची
शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ अशी करण्यात आली आहे. यासाठी नियमात आवश्यक ते बदल करण्यात
आले आहेत. यापूर्वी बँक खात्याला आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ अशी
होती. मात्र १ ऑक्टोबरनंतर नवीन खाते सुरू केलेल्या खातेदारांसाठी ही मुदत सहा महिन्यांची
असणार आहे. सरकानं अधिसूचित केलेल्या तारखेपर्यंत जर आधार आणि पॅन क्रमांक बँकेला सादर
केला नाही तर संबंधित ग्राहकांचे बँक खात्यावरचे व्यवहार बंद करण्यात येतील, असं सरकारनं
जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी
अधिवेशनाच्या काल तिसऱ्या दिवशीही कर्जमाफीसह
शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात विरोधक आक्रमक राहिले. विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी हौद्यात उतरून
एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. त्यामुळे
कालही कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधानसभेतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आणि राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या आकडेवारीला आक्षेप घेत सत्य
माहिती सभागृहात मांडण्याची मागणी केली.
****
विधानसभेत
विरोधी पक्षांनी ४० लाख हेक्टरवरच्या कपाशीवर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे
झालेल्या नुकसानीबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. याबाबत माहिती संकलित केली जात असल्याचं, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. मात्र त्यानंतरही विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं, अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित
केलं.
****
औरंगाबाद
इथल्या छावणी परिसरात गेल्या
नोव्हेंबर महिन्यात उद्भवलेल्या गॅस्ट्रो प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन
दिलं आहे. ते
काल विधानसभेत
आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. या भागातली
जुनी जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान योजनेतल्या एकशे अकरा
प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली असून त्यापैकी ६४ प्रस्तावांना पूर्ण अनुदान
देण्यात आलं असल्याचं, कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी काल विधानसभेत सांगितलं.
ही योजना बंद केल्याने िद्यापीठाच्याा उद्योजकांचं नुकसान झाल्याबाबतच्या प्रश्नाला
उत्तर देताना, फुंडकर यांनी, या निर्णयामुळे िद्यापीठाच्याा उद्योगाला चालना मिळणार
असल्याचं सांगितलं. योजनेतल्या उर्वरित ४७ प्रस्तावांचं अंशत अनुदान प्रलंबित असून
त्यांना नवीन योजनेनुसार अनुदान देण्यात येत असल्याची माहितीही फुंडकर यांनी दिली.
****
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळणं आवश्यक
आहे मात्र त्याच वेळेस सहकारी दूध उत्पादक
संघही अडचणीत येणार नाहीत यादृष्टीनं हिवाळी अधिवेशन काळातच बैठक घेऊन निर्णय घेतला
जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान सभेत या विषयावरच्या
लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या प्रशासकीय
आणि इतर खर्चावर नियंत्रण न आणता शेतकऱ्याला
दुधासाठी मिळणाऱ्या दुधावर नियंत्रण आणणं हे अन्यायकारक असल्याचं ते म्हणाले.
******
औरंगाबाद शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागेची
अडचण असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत एका तारांकित
प्रशाला उत्तर देताना दिली. आमदार धनंजय मुंडे, सतीश चव्हाण आणि अमरसिंह पंडीत यांनी
यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िद्यापीठाच्या अधिसभेवर
विधीमंडळाचे प्रतिनिधी म्हणून आमदार अमरसिंह पंडीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पाणबुडी आज पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्राला अर्पण केली जाणार आहे. डिझेल-इलेक्ट्रिकवर
चालणारी ही पाणबुडी आहे. अशा प्रकारच्या आणखी काही पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल
होणार असून, त्यातली ही पहिली पाणबुडी आहे. ‘
****
राज्यात काल १० नगरपरिषदा आणि नगरपंचायंतीच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान तर नांदेड जिल्ह्यातल्या किनवट नगरपालिकेसाठी ६२
टक्के मतदान झालं. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून केली जाणार
आहे.
*****
आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक
बातमी…..
वाशिम शहरातील तरुण इंजिनिअर अजिंक्य
धनंजय गोरे यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत २५ लाख रुपये कर्ज घेऊन
कोणार्क ट्रान्सफार्मर ही कंपनी उभी करून स्वतः सोबत नऊ लोकांनाही रोजगार दिला आहे.
ऐकूया त्यांची ही यशोगाथा.
माझ नाव
अजिंक्य धंनजय गोरे, मि वाशिमचा राहणारा आहे महाराष्टृ. मि माझी इंजिनिरिंग ईलेक्टिृकल
मुंबईवरणं कंमप्लीट केलेली आहे. इंजेनिरिंग झाल्या नंतर दोन वर्ष मुंबईला ऐका कंपनीमध्ये
जॉब केला. जॉब केल्या नंतर मि प्राय मिनिस्टर जनरेट प्रोग्राम अंतरर्गत 25 लाखाच्या
लोन साठी डि.आय.सी. मध्ये अप्लाय केल. लोन अप्लाय केल्या नंतर मला 25 लाखाचं लोन शांगसंग
झालं. एस.बि.आय. ने मला फंनडिंग केल. लोन मिळाल्या नंतर मि माझे कोनारक् टृांन्सफारमर नावाची कंपनी 5 जानेवारी 2017 रोजी
वाशिमला जालू केली. कंपनी चालू केल्या नंतर सद्या तिथे 9 लोकांनां रोजगार मिळतो आहे.
अधिक माझ निमिर्तीचं लायसंन जे मला प्राप्त झालेल आहे. त्याचं काम चालू आहे. दुसरी
गोष्ट रिंपेरिंगचं महाराष्टृचं इलेक्टीसिटी बोर्डचे आतापरीयंत 50 लाखाचे कामं जे मि
पुर्ण केलेलं आहे. आणि माझा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालू आहे.
****
मोहाली इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात
भारतानं श्रीलंकेवर १४१ धावांनी
दणदणीत विजय मिळवला. काल श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत,
भारतीय संघाला फलंदाजीला बोलावलं. कर्णधार रोहित शर्माची झंझावाती द्विशतकी खेळी आणि
श्रेयस अय्यरच्या ८३ धावांच्या बळावर भारतीय संघानं, निर्धारीत ५० षटकात ३९२ धावा करत,
श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं
आठ गडी बाद २५१ धावा
केल्या. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं तिसरं
द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन सामन्यांच्या
या मालिकेत आता दोन्ही संघ एक – एक अशा बरोबरीत असून, मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना
येत्या रविवारी विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निम्नतेरणा उपसा सिंचन योजनेसाठी
७ कोटी २४ लाख रूपयांचा निधी देण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जलसंपदा मंत्र्याकडे
केली आहे. निम्न तेरणा योजनेचे पाच पंपगृह गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत, यामुळे
लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातल्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या
निधिमुळे हे पंपगृह चालू होऊन ६ हजार ८९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असं ठाकूर
यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं अन्न आणि औषध विभागानं
टाकलेल्या छाप्यात तिघा जणांच्या घरातून गुटखा,
पानमसाला असा एकूण सात लाख ८५ हजार २१० रूपयांचा साठा काल जप्त करण्यात आला. या प्रकरणी
तीन जणांविरूद्ध कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी परिसरातल्या तेरणा सहकारी
साखर कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी आवसायकाची
नियुक्ती रद्द करून प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे
आमदार राणा जगजतसिंह पाटील यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.
*****
No comments:
Post a Comment