Thursday, 14 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १४  डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. एकूण १८२ जागांपैकी उत्तर आणि मध्य गुजरातमधल्या ९३ जागांसाठी मतदान होणार असून, ८५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधल्या राणिप इथल्या केंद्रावर मतदान केलं, तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनीही मतदान केलं.

****

कुष्ठरोगी आणि महारोगी शोध मोहिमेला गती दिली जाईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितलं. भाजपचे आमदार डॉ.मिलिंद माने, संजय केळकर,  काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, आदींनी कुष्ठरोगी बालकांच्या संख्येत वाढ झाली झाली असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. महारोगी आणि कुष्ठ रोग्यांसाठी काम करणाऱ्या संस्थाना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्क विचार केला जाईल आणि त्यांची थकीत असलेली अनुदानाची रक्कम येत्या तीन महिन्यात दिली जाईल अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

****

राज्यातल्या १० नगरपरिषदा आणि नगरपंचायंतींच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवत सत्तांतर घडवून आणलं आहे. भाजपच्या रजनी वानखेडे या तीन हजार मतांनी विजयी झाल्या असून, भाजपचे १७ पैकी ९ नगरसेवक निवडून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ पंचायत समितीसाठी चरगाव गणातून शिवसेनेच्या पुष्पा पाटील तर चरगाव गटातून शिवसेनेचेच नागो रामा बांगारा विजयी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या जया गाठ विजयी झाल्या.

****

हिंदी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. एका वर्षापासून ते कोमामध्ये होते. ‘फिर हेराफेरी’, ‘खिलाडी ४२०’ सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते, तसंच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होरा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  

****

वापरात नसलेले मोबाईल फोन्स, लॅपटॉप तसंच रेफ्रीजरेटर्स सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जगभर कचरा वाढत असून, या धोकादायक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर करण्याची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, आंतरराष्ट्रीय घनकचरा संघटना यांनी संयुक्तरित्या प्रसिध्द केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली. २०२१ पर्यंत जगभर अशा कचऱ्याचं प्रमाण ५२ पूर्णांक दोन दशांश दशलक्ष टन इतकं वाढेल आणि यामुळे मानवी आरोग्याला, तसंच पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

****

करचुकवेगिरीच्या संशयावरुन आयकर विभागानं देशभरात आभासी चलनविरोधी सर्वेक्षण मोहिम राबवली. देशभरातल्या नऊ शहरांमध्ये अनेकांच्या व्यक्तिगत डेटाबेसमध्ये लाखोंच्या नोंदी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली, गाजियाबाद, गुरुग्राम, पुणे, बंगळुरु, हैदराबाद आणि कोची इथं ही कारवाई करण्यात आली. विमुद्रीकरणानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी आभासी चलनाच्या झालेल्या वापरावरसुध्दा आयकर विभागाचं लक्ष आहे.

****

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनानं राज्यातल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधल्या उन्नत आणि प्रगत व्यक्ती आणि गटांकरता उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरुन आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री राम शिंदे यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातल्या ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****

दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात तिनं चीनच्या बिंगजिआयोचा २१ - ११, १६ - २१, २१ - १८ असा पराभव केला. सिंधूचा अ गटातला दुसरा सामना आज जपानच्या सयाका सातो बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत के. श्रीकांतला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आज त्याचा ब गटातला दुसरा सामना चीनी तैपेईच्या चाऊ तियान चेन बरोबर होणार आहे.

*****


No comments:

Post a Comment