Saturday, 16 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १६  डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

राहुल गांधी यांनी आज नवी दिल्ली इथं काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं राहुल गांधी यांना अध्यक्षपदाचं औपचारिक प्रमाणपत्र प्रदान केलं. माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी, देशातल्या तरुणांना एकत्र येऊन देशाचा विकास करण्याचं आवाहन केलं. सध्याच्या सरकारचं राजकारण लोकांच्या कल्याणासाठी राहीलेलं नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

****

कोळसा घोटाळ्यात दिल्लीच्या विशेष न्यायालयानं झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना तीन वर्षाचा तुरुंगवास आणि अनुक्रमे २५ लाख आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. झारखंडचे माजी मुख्य सचिव ए के बसु आणि मधु कोडा यांचे निकटवर्तीय विजय जोशी यांनाही तीन वर्षाच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच या प्रकरणात न्यायालयानं कोलकात्याच्या विनी आयर्न ॲण्ड स्टील उद्योग लिमीटेड या कंपनीलाही ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनियमित पद्धतीनं खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्यानं मधू कोडा यांच्यासह सर्व आरोपींना कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयानं गेल्या बुधवारी दोषी ठरवलं होतं. न्यायालयानं या निर्णयावर उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरामची राजधानी ऐझवालमध्ये ६० मेगावॅटच्या हायड्रो ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. केंद्र सरकारनं राज्यात कार्यान्वित केलेला हा पहिलाच मोठा प्रकल्प असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. या प्रकल्पामधून या राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारची प्रतिबद्धता दिसून येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

देशात ८० टक्क्यांहून अधिक वस्त्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जोडल्या गेल्या आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्लीमध्ये या योजनेच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या जनतेला चांगले रस्ते उपलब्ध होण्यासाठी या क्षेत्रातल्या रस्ते योजना मार्च २०१९ पर्यंत वेगानं पूर्ण करण्याच्या सुचनाही सिंह यांनी यावेळी दिली.

****

सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळे दुखणे आणि आजारांसाठी नियमीत डोस म्हणून देण्यात येणाऱ्या ३४९ औषधींची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश औषधी तांत्रिक सल्लागार मंडळाला दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं या औषधींवर बंदी आणण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. केंद्र सरकारनं ही बंदी घालताना औषधी आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या तरतुदींचं पालन केलं नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र, केंद्र सरकारनं औषधी कायद्याच्या तरतुदीखालीच अध्यादेशाद्वारे या ३४९ औषधींवर बंदी आणली असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र याबाबत अधिक तपशील मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या औषधींची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

२०१७ च्या वित्त कायद्याअंतर्गत देशातल्या १९ न्यायाधिकरणांमध्ये न्यायिक आणि अन्यायिक पदांच्या नेमणुकांसाठीच्या अटी आणि शर्तींच्या सुधारित नियमांचं प्रारुप सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहे. न्यायाधिकरणांमध्ये चार जानेवारी रोजी होणाऱ्या नेमणुका या नियमांनुसार करण्यात येणार आहेत. अनेक नागरिकांनी वित्त कायदा २०१७ हे न्यायाधिकरणांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचं सांगत न्यायाधिकरणांच्या नेमणूक  नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

****

रेल्वेनं मोठ्या रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वापर वाढवला असल्याचं  रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत गोहेन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली. रेल्वेच्या स्वच्छता नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं करण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम केली असल्याचंही ते म्हणाले. रेल्वे विभाग प्रशासनाकडून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवल्या जात असल्याचंही गोहेन यावेळी म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात एक अज्ञात दहशतवादी विस्फोटक तयार करताना मारला गेला. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हा दहशतवादी असून, पुढील तपास सुरु असल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक एस पी वेद यांनी सांगितलं.

****

दुबईमध्ये जागतिक सुपर सिरीज अंतिम बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुचा सामना आज चीनच्या चेन-यूफेइशी होणार आहे. सिंधुनं या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त करून महिला एकेरीच्या गटात अग्रस्थान मिळवलं आहे.

*****




No comments:

Post a Comment