Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. काही ठिकाणचे
निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार
एकूण १८२ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं चार, तर काँग्रेसनं दोन जागांवर विजय मिळवला
आहे. तर भाजप १०४, काँग्रेस ६७ आणि इतर पाच जागांवर आघाडीवर आहेत. भावनगर पश्चिम मतदारसंघातून
भाजप गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जीतूभाई वघानी विजयी झाले.
हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं दोन तर काँग्रेसनं एका
जागेवर विजय मिळवला. तर भाजप ४१, काँग्रेस २१ आणि इतर तीन जागांवर आघाडीवर आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा आरोप केल्याच्या
मुद्यावरुन राज्यसभेत आज पुन्हा काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला. विरोधकांनी सभापतींच्या
आसनासमोर हौद्यात उतरुन पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली. आजच्या दिवसाचं कामकाज
सुरु होताच काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांनी
सभागृहात येऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते गुलाम
नबी आझाद यांनी केली. या मुद्यावर गोंधळ वाढत गेल्यानं कामकाज सुरवातीला ४५ मिनीटांसाठी
तहकुब झालं, त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
झालं.
लोकसभेतही याच मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
करण्यात आलं.
****
विधानसभेत आज विरोधकांनी, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत इमारती पडण्याच्या
घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यानं, सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा कमी पडत असून, अधिकाऱ्यांना
पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला
आज सुरूवात होताच साकीनाका इथल्या दुकानाला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेसचे सुनिल
केदार यांनी हा मुद्दा उपस्थित करून या घटनेची वस्तुस्थिती सभागृहात देण्याची मागणी
केली. या घटनेकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवत असून, याची सर्व माहिती सभागृहात
सादर करू असं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं महिला आरक्षण विधेयक संमत करण्यासाठी सर्वपक्षीय
सहमती व्हायला हवी असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात महिलांना
३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात हे विधेयक
आहे. भोपाळ इथं आयोजित महिला बचत गटांच्या
राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण असून संसदेतही ते मिळावं
यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले.
****
भारतीय नागरिकांनी २०१८ या नववर्षाचं स्वागत सकारात्मकता, कृतज्ञता आणि आनंदाचा संदेश देऊन करावं
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नागरिकांनी २०१७ मधले आपले पाच सकारात्मक
अनुभव लघुकथा, चित्रफिती किंवा छायाचित्रांच्या माध्यमातून
समोर आणावेत असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. पॉझिटिव्ह इंडिया हा हॅशटॅग वापरून आपण सगळ्यांनी नव्या
वर्षांचं स्वागत करायला हवं असं सांगून पंतप्रधानांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट
माय जी.ओ.व्ही. डॉट इन या संकेतस्थळावर २५ डिसेंबरपर्यंत आपण आपले अनुभव अपलोड करण्याचं आवाहन केलं.
****
भारतीय न्याय व्यवस्था तसंच शिक्षण व्यवस्थेत काळानरूप बदल न झाल्यानं या दोन्ही
व्यवस्थांत अमूलाग्र सुधारणांची गरज असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी
व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या सिंबॉयसीस इंटरनॅशनलच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात
ते बोलत होते. देशातले तरुण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही क्षेत्राचं
नेतृत्त्व करु शकतील यादृष्टीनं त्यांना प्रशिक्षित करायला हवं असं ते म्हणाले.
****
पालघर जिल्ह्यातल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर
विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निशा सवरा यांचा पराभव केला. शिवसेनेनं
सहा, भाजपनं सहा, काँग्रेसनं दोन, बहुजन विकास आघाडीनं दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसनं
एक जागा जिंकली.
नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, तर नवापूर नगरपालिकेच्या
नगराध्यक्षपदीही काँग्रेसच्या हेमलता पाटील विजयी झाल्या. तर तळोदा नगरपालिकेत सत्तांतर
झालं असून, नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी विजयी झाले.
*****
No comments:
Post a Comment