Wednesday, 20 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****



Ø बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश- कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत

Ø उपसा जलसिंचन योजनेचे नवे दर उन्हाळी हंगामामध्ये ठरवणार

Ø समृद्धी महामार्गावरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांनी विकत घेतल्याचं चौकशीत आढळून आलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Ø कुळ, इनाम आणि गायरान जमिनीच्या विक्रीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके निलंबित; अन्य तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

आणि

Ø औरंगाबाद महापलिकेतल्या टीडीआर घोटाळ्याची सहा महिन्यात चौकशी करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

*****

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, तक्रारी घेण्याचं काम सुरु झालं आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल विधानपरिषदेत दिली. हा अहवाल केंद्र सरकारलाही पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार, अशी ग्वाही खोत यांनी दिली. बीटी बियाणांच्या संशोधनाचं काम प्रगतीपथावर असून, लवकरच नवं वाण उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभेतही काल राज्यातल्या कपाशी पिकांचं बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटनेकडे खासदार सुप्रिया सुळे आणि प्रतापराव जाधव यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी जाधव यांनी केली.  

****

जलसंपदा विभागाच्या उपसा जलसिंचन योजनेचे नवे दर उन्हाळी हंगामामध्ये ठरवणार असून, याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल विधानसभेत सांगितलं. याबाबत सदस्य अनिल बाबर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार उपसा सिंचन योजनेची वीज देयके भरण्यासाठी ती लाभधारकांकडून वसूल करणं अपेक्षित आहे, मात्र लाभधारकांकडून ही वसुली वेळेवर होत नसल्यामुळे ही वीज देयकं प्रलंबित राहत आहेत, परिणामी अनेक उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नागपूर - मुंबई जलदगती समृद्धी महामार्गावरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांनी विकत घेतल्याचं चौकशीत आढळून आलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोतराच्या तासांत  सांगितलं. जर या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते शासनाकडे द्यावेत,  त्याची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. या महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, त्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

कुळ, इनाम आणि गायरान जमिनीच्या विक्रीत गैरव्यवहार केल्याचं प्रारंभिक चौकशीत स्पष्ट झाल्यानं औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केलं आहे. या जमिन गैरव्यवहार प्रकरणी पैठण तालुक्यातले भाऊसाहेब काळे यांनी तक्रार केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एल सोरमारे, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी किसन लवांडे आणि तत्कालिन उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपुत यांनाही,  याप्रकरणी,  त्यांच्याविरुद्ध कारवाई का करु नये, अशा आशयाची नोटीस  बजावण्यात आल्याचं भापकर यांनी सांगितलं.

दरम्यान, याच प्रकरणी काल विधानपरीषदेत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि इतरांनी या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.   औरंगाबाद जिल्ह्यातल्या कुळ, इनाम, गायरानसाठी आरक्षित असलेल्या सुमारे १२५ प्रकरणात जमिनी विक्री करण्याची परवानगी या अधिकाऱ्यांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत देऊन, शासनाचं १५० कोटी रूपयांचं नुकसान केल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. या व्यवहारात तत्कालीन अधिकाऱ्यांसह संबंधीत विभागातले कर्मचारीही सहभागी असल्याचं आ. चव्हाण यांनी सभागृहात सांगितलं.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेची बोगस काम करणाऱ्या २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृषी आयुक्तालयानं निलंबित केलं आहे. या कामांमध्ये जवळपास चार कोटी रूपयांहून अधिक रकमेची बनावट कामं झाल्याचं निर्दशनास आलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी संसद दत्तक ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या  उस्मानाबाद जिल्ह्यातल्या डोंजा गावाला काल भेट दिली. तेंडुलकर यांच्या या भेटीविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….



मास्टर-ब्लास्टर, खासदार सचिन तेंडुलकर यांच्या स्वागतासाठी डोंजा गावात गावकऱ्यांनी, चौकाचौकात उत्साहानं ढोलताशे वाजवत या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता दुताचं हर्षोल्हासात जंगी स्वागत केलं. गावासाठी विकास कामांचं उद्घाटन त्यांनं केलं. अंगणवाडी प्राथमिक शाळेतल्या चिमुकल्यांसोबत संवादही साधला. या स्वच्छता दुतानं स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करण्याचं आवाहनही गावकऱ्यांना केलं. या कार्यक्रमात खा.सचिनच्या हस्ते अवयवदानाचा संकल्प करणाऱ्या १०० महिलांपैकी प्रातिनिधीक महिलांचा आणि लोकराज्य बचत गटाला ‘लोकराज्य’ या महाराष्ट्र शासनाच्या मासिकाचं प्रमाणपत्र तसंच प्रौढ साक्षरता आणि गावातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार सचिनच्या हस्ते या कार्यक्रमात गौरवण्यात आलं. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.





****

औरंगाबाद महापलिकेत गेल्या नऊ वर्षात झालेल्या २२८ विकास अधिकारांचे हस्तांतरण-टीडीआर घोटाळ्याची चौकशी, येत्या सहा महिन्यात भूमिअभिलेख खात्याच्या सहायक संचालकांकडून केली जाईल, असं आश्वासन नगर विकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल विधान सभेत दिलं. या संदर्भात आमदार इम्तीयाज जलील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. या आधी टीडीआर प्रकरणी झालेल्या चौकशीत केवळ चार प्रकरणांची चौकशी झाली असून तीन अधिकारी निलंबित झाले होते असंही जलील यांनी सांगितलं.

****

राज्य महिला आयोग आपल्या दारी योजने अंतर्गत काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या २० तक्ररींवर सुनावणी घेण्यात आल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी सुनावणीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. शहरांमध्ये खासगी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थींनींचा पोलिसांनी एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्याची सूचना करताना रहाटकर म्हणाल्या..



शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या मुली बाहेरहून येऊन इथं राहतात आणि शिकायला आहेत त्या, हॉस्टेलमध्ये आहेत त्या.त्या सगळ्या हॉस्टेल चालकांची एक मिटींग पोलिसांनी केली पाहिजे.आणि सुरक्षेबद्दल उपाय योजन करण्याबाबत पोलिसांनी त्यांना सूचना दिल्या पाहिजे.एक हे सांगितलं आहे.आणि दुसरं ज्या हॉस्टेलमध्ये मुली एकट्या राहत आहेत.त्या मुलींच्या इच्छेनं वॉटस्ॲप ग्रुप सुरू करता येऊ शकतात.त्या त्या हॉस्टेलचे तो जो ग्रुप आहे त्याच्यावर जी पोलिस अधिकारी असेल ती महिला पोलिस अधिकारी असेल.असे वॉटस ॲप ग्रुप तयार करायचे आणि मुलींच्या काही अडचणी असेल तर त्या मागवून घ्यायच्या

****

मराठवाड्याच्या न्यायहक्कासाठी मराठवाडा विकास सेना या नव्या पक्षाची स्थापना केली असल्याची माहिती काल औरंगाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांनी दिली. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन हा नवा पक्ष स्थापन केला आहे.

****

शेतकऱ्यांचे विविध  प्रश्न सोडवले जावेत यासाठी काल परभणी इथं शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली  ढोल ताशे वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत जाधव यांनी महानगरपालिका आणि पोलिसांवर जोरदार टीका केली.

*****

औरंगाबाद इथं काल निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवडणूक ज्ञान प्रश्नमंजुषा  स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे जिल्ह्याच्या संघानं दुसरा तर उस्म्नानाबाद जिल्ह्याच्या संघानं तिसरा क्रमांक पटकावला. विजेता संघ राष्ट्रीय पातळीवर राज्याचं नेतृत्व करेल. या स्पर्धेत ३६ जिल्ह्यातले  ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधल्या लिंबगावात दोन सख्खे भाऊ शाळेतून घरी येत असतांना पाझर तलावात बुडून मरण पावले. यामधला मोठा भाऊ अकरा वर्षांचा तर लहान भाऊ ७ वर्षांचा होता.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेमध्ये एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र आणि क्लबची उभारणी करण्यात आली आहे. या विज्ञान केंद्राचं उद्घाटन परवा शुक्रवारी दिल्लीच्या भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद रानडे यांच्या हस्ते होणार आहे, असं या केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी काल वार्ताहरांला सांगितलं.

*****

बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन या संघटनेचं व्दिवार्षीक अधिवेशन येत्या  २४ आणि २५ डिसेंबरला लातूर इथं होणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. मेळाव्याला एआयबीईच्या सहसरचिटणीस ललीता जोशी, बॅंक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेच्या नेत्या आशा शेलार मार्गदर्शन करणार आहेत.

******




No comments:

Post a Comment