Wednesday, 20 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२० डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

ग्रामीण भागातल्या शासकीय जमीनीवर केलेली निवासी अतिक्रमणं नियमानुकुल करण्याच्या धोरणासंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. एका लक्षवेधी सुचनेला उत्तर देतांना त्या बोलत होत्या. या संदर्भात झालेल्या बैठकीत १ जानेवारी २००० पुर्वी पासूनचा अतिक्रमणधारक असेल आणि त्याला घर नसेल तर त्याला ५०० चौरस फुट जागा विनामुल्य कायमस्वरूपी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी येत्या दोन वर्षात पाच लाख शेतकऱ्यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. उर्वरित शेतीपंपही टप्प्या टप्प्यानं सौर ऊर्जेवर आणण्यात येतील असंही त्यांनी सांग़ितलं. गेल्या ३ वर्षात विदर्भ, मराठवाडा आणि वीज जोडणीचा अनुशेष असलेल्या जिल्ह्यात साडेचार लाखांवर वीज जोडण्या देण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

शहीद जवानांच्या वारसांना लष्करात नोकरी देण्यास सरकार प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी काल लोकसभेत सांगितलं. शहीद जवानांच्या कुटुंबांना केंद्र आणि राज्यांकडून संयुक्तरित्या जास्तीत जास्त मदत मिळण्यासंदर्भात भाजपचे परवेश साहीब सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. देशातल्या युवकांना लष्करात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरीता एका विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु असल्याचंही अहीर यांनी यावेळी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा, नरहर कुरूंदकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोरडे यांना जाहीर झाला आहे. येत्या २६ तारखेला नांदेड इथं मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल, असं नांदेड जिल्हा परिषदेतर्फे कळवण्यात आलं आहे.

*****

No comments:

Post a Comment