आकाशवाणी
औरंगाबाद.
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज
दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दोन वेगवेगळ्या
खटल्यांवर न्यायालयानं आज अंतिम निर्णय सुनावला. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा
आणि खासदार कनिमोझी यांच्यासह १७ जण या प्रकरणात दोषी होते. या प्रकरणाची सुनावणी सहा
वर्षांपूर्वी सुरु झाली होती.
****
तामिळनाडूमध्ये चेन्नई मधल्या आर के नगर विधानसभा
मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे
जयललिता यांच्या मृत्यूनंतर या जागेवर ही निवडणूक होत आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड
मुनेत्र कळघम - ए आय ए डी एम केचे वरीष्ठ नेता आणि माजी मंत्री ई मधुसूदन, द्रविड मुनेत्र
कळघम - डी एम के पक्षाचे एन मरुथु गणेश, व्ही के शशिकला यांचा भाचा टी टी वी दिनकरन
आणि भारतीय जनता पक्षाचे के नागराज यांच्यात ही निवडणूक होत आहे.
अरुणाचल प्रदेश मधल्या पक्के कसांग आणि लीकाबली,
उत्तर प्रदेश मधल्या सिकंदरा आणि पश्चिम बंगाल मधल्या सबांग विधानसभा मदारसंघासाठीही
आज पोटनिवडणूक होत आहे.
****
नवीन ग्राहक
संरक्षण विधेयक २०१७ला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामध्ये ग्राहकांचे
अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर
भेसळीची प्रकरणे आणि कंपन्याच्या भ्रामक जाहिरातींसाठी दंडाची शिक्षा करण्याची तरतूदही
या विधेयकात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या नामांकित व्यक्तींनाही
दंड ठोठावण्याची तसंच तीन वर्षापर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याच्या शिक्षेचीही तरतूद
या विधेयकात आहे.
****
परभणी आणि
पूर्णा शहरातल्या नागरिकांच्या पिण्याच्या
पाण्याची गरज भागवण्यासाठी जालनामधल्या निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदी पात्रात
काल दुपारी, १ हजार २०० दशलक्ष घनफूट वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदी काठच्या
गावातल्या नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरं, नदी पात्रात जाणार नाही
याची दक्षता घ्यावी असं आवाहन परभणी जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
*****
No comments:
Post a Comment