Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा
मुद्दा लावून धरल्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दुपारपूर्वीच दिवसभरासाठी तहकूब करावं
लागलं. विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करत अध्यक्षांच्या
आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज
सुरवातीला तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.
विधानपरिषदेतही कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी
प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या
गदारोळातच विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचं कामकाज लोकशाही
मार्गानं चाललं पाहिजे असं सांगत, कामकाज सुरू करण्याचं आवाहन केलं. या गोंधळातच "छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान" कर्जमाफीच्या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या
२०१७-१८ च्या २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या
आणि अन्य कागदपत्रं सभागृहासमोर मांडण्यात आली. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत
गेल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
दरम्यान, आज विधीमंडळात कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या
आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
केली.
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार
गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. आज नागपूर शहरात विरोधी पक्षांनी सरकारविरोधात मोर्चा
काढला. काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हल्लाबोल
मोर्चा काढण्यात आला. दीक्षाभूमी इथून निघालेल्या या मोर्चांचं मॉरिस कॉलेज चौकात जाहीर
सभेत रूपांतर झालं, या सभेला संबोधित करताना, आझाद यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून
टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, रिपब्लीकन पार्टी
कवाडे गटाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह
विरोधी पक्षांचे अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते. जनसामान्यांचा आक्रोश बुलंद
करण्यासाठी हा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला असल्याचं, अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या शुक्रवारी १५ डिसेंबरपासून सुरु होणार असून, सरकारनं
परवा गुरुवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सर्व पक्षीय सदस्यांनी संसदेचं
कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार
यांनी केलं आहे. या अधिवेशनात तिहेरी तलाकसह मागासवर्गीय आयोगाच्या संवैधानिक स्तरासंबंधीच्या
विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
बँकाचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला
उशीर होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं परराष्ट्र मंत्रलायाकडे विचारणा केली आहे.
यासंदर्भात मंत्रालयाला १५ डिसेंबरला उत्तर देण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं
आदेश देऊनही मल्ल्याच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकार उशीर करत असल्याबद्दल न्यायालयानं
नाराजी व्यक्त केली आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठीचा खटला इंग्लंडच्या न्यायालयात
सुरु आहे.
****
डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे
भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झाल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
राज्यमंत्री के जे अल्फोन्स यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं डिजिटल व्यवहार
सुरक्षा उपक्रम सुरु केल्यानंतर बोलत होते. जास्तीत जास्त नागरिकांनी डिजिटल व्यवहार
करण्यास सुरुवात केल्यास अर्थव्यवस्थेला तितकीच मदत होईल, असं ते म्हणाले.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या ७९ हजार
२६ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जापोटी बँकांना
मिळालेले ३०१ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात बनेगाव पाटीजवळ आज ट्रक आणि कारची समोरासमोर
धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधले दोन जण जागीच ठार तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला.
ही कार जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरहून नांदेडकडे जात असताना, ही दुर्घटना घडली.
****
राज्यातल्या काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. यात नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतींचा समावेश आहे.
याठिकाणी मतदानासाठी उद्या सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
दुसरा सामना उद्या पंजाबमध्ये मोहाली इथं होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment