Sunday, 17 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात औद्योगिक वसाहतीत जागेचा ताबा घेतल्यापासून पाच वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर सवलती देण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ इथं उभारण्यात आलेल्या वस्त्रोद्योग पार्कमध्ये रेमंड उद्योग समुहाच्या लिनन यार्न आणि कापड निर्मिती उद्योगाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं जिगाव प्रकल्पासह आठ लघुसिंचन पाटबंधारे प्रकल्पांचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. जिगाव प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही तसंच खारपाण पट्ट्यातल्या शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय परिवहन, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी उपस्थित होते.

****

दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेमुळे औरंगाबाद विभागाची भरभराट होईल, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं ‘रोटरी जालना औद्योगिक एक्स्पो २०१७’च्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यामुळे राज्यात जास्त गुंतवणूक झाली असल्याचं ते म्हणाले. मेक इन इंडिया, कौशल्य भारत यासारख्या उपक्रमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेमुळे औरंगाबाद आणि जालना हे दोन शहरं येत्या सात ते आठ वर्षात एक होणार असल्याचं दानवे यावेळी म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमध्ये हिमवादळात बेपत्ता झालेल्या पाच जवानांपैकी एकाचा मृतदेह आज कुपवाडा जिल्ह्यातल्या नौगाम हंदवाडा सेक्टर परिसरात सापडला. कौशल सिंह असं या जवानाचं नाव असून, पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर हा मृतदेह सापडल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं. बाकी जवानांचा शोध घेणं सुरु असल्याचं ते म्हणाले.

****

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गुजरातच्या १८२ जागांसाठी नऊ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यात, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांसाठी गेल्या महिन्यात नऊ तारखेला मतदान झालं होतं. गुजरात मध्ये ६८ पूर्णांक ४१ शतांश टक्के तर हिमाचल प्रदेशात ७४ पूर्णांक ६१ शतांश टक्के मतदान झालं होतं.

****

‘ब्रम्होस’ या क्षेपणास्त्राला सुखोई लढाऊ विमानाला जोडण्याचं काम सुरु झालं आहे. अशा चाळीस विमानात ही क्षेपणास्त्र जोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भारतीय हवाई दलाची खूप मोठी गरज पूर्ण होणार आहे. विमानातून प्रक्षेपित होणाऱ्या ब्रम्होस क्षेपणास्त्राची चाचणी गेल्या महिन्यात घेण्यात आली होती. 

****

जालना जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावानं झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्ह्यात सुरु असलेल्या पंचनाम्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचं काम सुरु असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेला आज अनेक भाविकांनी हजेरी लावली. आज सुटीच्या दिवशी अनेक शाळांच्या सहली माळेगाव यात्रेत दाखल झाल्या. या यात्रेत जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात जळगाव सपकाळ इथले शेतकरी बाबुराव कुरकुले यांचा आज कोल्हापूर बंधाऱ्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. बंधाऱ्याचा काही भाग खचल्याचं ही दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला कुस्तीपटूंनी नऊ सुवर्ण पदकांसह वीस पदकांची कमाई केली. महिला संघानं ग्रीको रोमन स्पर्धेत सगळ्या सहा गटात नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदक जिंकले. भारतीय पुरुष संघानी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दहा सुवर्ण पदकांसह वीस पदकं पटकावली.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर २१६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिले फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४५व्या षटकात २१५ धावा करुन सर्वबाद झाला. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी तीन, हार्दिक पंड्यानं दोन, तर जसप्रित बुमराह आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

No comments:

Post a Comment