Monday, 18 December 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 18.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. गुजरातमध्ये भाजपला सलग सहाव्यांदा सत्ता कायम राखण्यात यश आलं आहे. एकूण १८२ जागांपैकी आतापर्यंत घोषित निकालानुसार भारतीय जनता पक्षानं ८३, काँग्रेसनं ७१, तर इतर पक्षांनी चार जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजप १७, काँग्रेस पाच आणि इतर दोन जागांवर आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होत असून, भाजपला याठिकाणीही स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट होत आहे. एकूण ६८ जागांपैकी घोषित निकालानुसार भारतीय जनता पक्षानं २२, काँग्रेसनं १२, तर इतर पक्षांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे.

विकासाच्या मुद्यावर भाजपला हा विजय मिळाल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेनं पाठिंबा दिला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे भरत राजपूत विजयी झाले. राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिहीर शहा यांचा पराभव केला. तर जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल विजयी झाले आहेत. 

****

राज्यातल्या २३ पाणीपुरवठा योजनांना सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे, १५ दिवसात त्यासाठी कार्यारंभ आदेश देऊन या योजनांचं काम सुरु करता येईल, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव परिसरातल्या ८१ गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राज्यातल्या पाणी पुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय निविदा मंजूर होत नसल्याचा आरोप केला. 

****

राज्यात छुप्या मार्गानं विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राज्यावर सध्या चार लाख ६४ हजार कोटी रुपयांचं कर्ज असलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे आनंदराव पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कर्जमाफीसाठी लागणारा निधी पूर्णपणे राज्य सरकार देणार असून, केंद्राकडून मदत मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर राज्य आर्थिक डबघाईला आलं असून, अर्थमंत्री सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल तटकरे यांनी केला.

****

हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकून मजुरी घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचं रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. गरज भासल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असं ते म्हणाले.

****

बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मागणीनुसार शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम डी. सिंह यांनी केली आहे. बीड इथं आज शेतकरी आत्महत्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं सर्वेक्षण केलं असून, त्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या घाणेगाव इथल्या ४० ग्रामस्थांनी आज जांबसमर्थ तलावात उतरून चार तास जलसमाधी आंदोलन केलं. स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, विक्रेत्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला. तहसीलदार आश्विनी डमरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन, संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्याची पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी निवड झाली आहे. या माध्यमातून तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी आज उपविभागीय कार्यालयात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातल्या प्रत्येक गावानं या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असं आवाहन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी केलं आहे.

//********//


No comments:

Post a Comment