Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्याच्या हिताचं जलनियोजन करणं, हीच पद्मभूषण बाळासाहेब
विखे-पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केलं. प्रवरानगर इथं आज बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री
प्रा.राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची
उपस्थिती होती.
बाळासाहेबांचा पाणी प्रश्नावर सखोल अभ्यास होता. त्यांच्या
पाणी प्रश्नावरील अभ्यासाचा नेहमीच राज्याला लाभ झाला असून दमणगंगा-पिंजाळ योजनेतून
५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या योजनेला केंद्र सरकारनंही तत्वत: मान्यता
दिली आहे. त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून शेतकऱ्यांना
समृद्ध करण्याचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया
सुरळीत होण्याच्या दृष्टीनं तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठीच
० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नाही तर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याचं
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. सदस्य विक्रम काळे यांनी
नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर ते बोलत होते. ० ते २० पेक्षा पटसंख्या कमी
असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह
शिक्षकांचंही समायोजन करण्यात येणार आहे. जेणे करुन कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील
विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होऊ शकतील आणि त्यांचं हित जपलं जाईल,
असं तावडे यांनी सांगितलं.
****
नाशवंत मालाला योग्य बाजारभाव मिळण्याकरिता गठीत केलेल्या
समितीचा अहवाल येत्या महिनाभरात प्राप्त होईल, असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. आमदार अस्लम शेख यांनी विचारलेल्या प्रश्नाला
उत्तर देताना ते बोलत होते. या ११ सदस्यीय समितीच्या नागपूर, पुणे, वर्धा, नाशिक, सोलापूर
अशा पाच ठिकाणी बैठका झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांची वीज बिलं दुरुस्त करण्यासाठी फिडर निहाय कॅम्प
घेण्यात येतील तसंच विना नोटीस वीज जोडणी खंडीत केली जाणार नाही असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य डी.एस.अहिरे यांनी
धुळे जिल्ह्यातल्या कापडणे उपकेंद्राअंतर्गत असलेलं रोहीत्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत
उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर असलेल्या
जोडणीधारकानं तीन वर्षासाठीचे प्रत्येकी तीन हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र सुरु होणार
नाही, असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ऑक्टोबर अखेरपर्यंत
२६ हजार ३५६ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कृषी
पंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आली असल्याचंही अन्य एका प्रश्नाच्या
लेखी उत्तरात बावनकुळे यांनी सांगितलं.
****
तूर खरेदी करण्यासाठी यावर्षापासून शेतकऱ्यांची ऑनलाईन
नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य डॉ. मिलींद माने यांनी जालना जिल्ह्यातल्या नाफेड
केंद्रावर तूर विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्याला
लेखी उत्तर देताना खोत बोलत होते. यावर्षी तुरीच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत केंद्र सुरु
केलं जाणार असून तुरीमध्ये आर्द्रता बारा टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास खरेदीमध्ये सवलत
देण्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या दोन हजार ६१६ अकार्यक्षम संस्थांची
नोंदणी रद्द करण्यात आली असल्याची माहिती लातूरचे सह धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर
यांनी दिली. अकार्यक्षम संस्थांची नोंदणी रद्द करण्यासंबंधी विशेष मोहीम राबवली जात
आहे. सदरील कार्यवाही दुसऱ्या टप्प्यातली असून यापुढेही अशा संस्थांची नोंदणी रद्द
करण्याची कार्यवाही सुरूच राहणार असल्याचं हेर्लेकर यांनी सांगितलं.
****
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर खालापूरनजिक झालेल्या
अपघातात तीन जण ठार तर अन्य सातजण जखमी झाले. आज दुपारी अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात
झाला. जखमींना कळंबोलीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. खालापूर पोलिसांनी
दिलेल्या माहिती नुसार मुंबईहून पुण्याकडं जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा मागचा टायर फुटला
आणि गाडीचा वेग आवरण्याच्या प्रयत्नात ही गाडी समोरून येणाऱ्या रिटझ् गाडीवर जाऊन आदळल्यानं
ही दुर्घटना घडली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नितीन आगे या मुलाचं हत्या प्रकरण
अहमदनगर जिल्हा न्यायालयात नव्यानं चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं दिले आहेत. तसंच सर्व साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवण्याचेही आदेश न्यायालयानं
दिले आहेत. नितीन आगे हत्या प्रकरणी संजय भालेराव यांनी एका सामाजिक संस्थेतर्फे उच्च
न्यायालयात याचिका दाखल केली होती.
****
No comments:
Post a Comment