Friday, 29 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अग्निकांड झालेल्या कमला मिल्स परिसराची पाहणी करून, परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरातली अशाप्रकारची अनधिकृत बांधकामं शोधून कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, ही आग लागल्याची घटना म्हणजे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महापालिकेच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. संबंधित हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालं होतं, तसंच या ठिकाणी आग विझवण्याची सक्षम यंत्रणा नव्हती, असं ते म्हणाले. या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अग्निकांडात १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण होरपळल्याचं वृत्त आहे.

****

दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ आज लोकसभेत संमत करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज हे विधेयक सादर केलं होतं. हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं कर्ज परतफेड करण्याच्या योजनेत समाविष्ट न करण्याची, तसंच कर्ज असलेली संपत्ती विकण्यास मनाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी, रालोआ सरकारच्या काळात बँकांच्या अनुत्पादीत मालमत्तेत वाढ झाल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. सरकारनं अनुत्पादीत मालमत्तेचा खरा आकडा सांगितल्याचं ते म्हणाले. दिवाळखोरीच्या मुद्यांचं निराकरण करण्यासाठी अध्यादेश काढणं आवश्यक असल्याचं जेटली यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशात काळा पैसा किती आहे याची अधिकृत आकडेवारी नसल्याचं जेटली यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशाबाहेर असलेला काळा पैसा हस्तगत करण्यासाठी तसंच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभेत काल संमत झालेलं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सहज संमत व्हावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केलं आहे. ते आज संसद भवनाच्या बाहेर वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात सरकार सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशात अनेक वर्षांपासून सुरू असलेली तिहेरी तलाकची परंपरा संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येकानं सरकारला सहकार्य केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

****

नागरिकांनी आभासी चलनाचा वापर करु नये, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आभासी चलन हे कायदेशीर चलन नाही, तसंच ते सुरक्षित नसल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. बीटकॉईन किंवा अन्य आभासी चलनामुळे आर्थिक नुकसानाचा धोका संभवतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. नीति आयोगानं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणं आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत.

****

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी च्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आज दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर अशी या दोघा अधिकाऱ्यांची नावं असून, त्यांनी एका कर्मचाऱ्याला सेवेत कायम करून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी लाच मागितली होती. संबंधिताच्या तक्रारीवरून आज वाल्मी इथं संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

****

जालना इथल्या फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा ‘वेणुताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथल्या कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे सहावं वर्ष असून, येत्या एक जानेवारीला जालना इथं ज्येष्ठ समीक्षक डॉ.मनोज तायडे यांच्या हस्ते या पुरस्कारचं वितरण होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे कैलास भाले यांनी आज वातार्हर परिषदेत दिली.

****

मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून परभणी इथं आज सकाळी नऊ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद इथं साडे नऊ तर नांदेड इथं १० अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment