Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 05 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ओखी चक्रीवादळाचा परिणाम आज राज्यात बहुतांश ठिकाणी जाणवत
असून, मुंबईसह अनेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. दक्षिण मुंबई, कोकणात मुसळधार पावसानं
जनजीवन विस्कळीत झालं आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरु
असून, दिंडोरी निफाड या भागात शेतपिकांचं विशेषतः द्राक्ष बागांचं पावसामुळे मोठं नुकसान
होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धुळे, नंदुरबार तसंच सातारा, जिल्ह्यात आज पावसानं
हजेरी लावली. औरंगाबाद शहरातही दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
उद्या सकाळपर्यंत मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातही
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्या असून, यानिमित्त आंबेडकरांच्या जीवनाची सचित्र माहिती देणाऱ्या एका पुस्तिकेचं प्रकाशन आज मुंबई
इथं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे, अनुयायांसाठी व्यवस्था केलेल्या
शिवाजी पार्क मैदानावरही पाणी साचलं आहे. महापालिकेनं
चैत्यभूमीपासून दादर चौपाटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेते
शशी कपूर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत सांताक्रूज इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी यावेळी शशी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. शशी
कपूर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते.
****
आर्थिक गैरव्यवहार
प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन
भुजबळ आणि इतरांच्या वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीवर टाच आणली आहे. याप्रकरणी
आतापर्यंत एकूण १७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
स्वच्छ महाराष्ट्र
अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांची मानसिकता आणि सवयी बदलण्यासाठी प्रशासनानं काम करावं असं आवाहन पाणीपुरवठा
आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत
होते. राज्यात आतापर्यंत १५ जिल्ह्यातले १९८ तालुके आणि ३१ हजार १७२ गावं उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात
उत्कृष्ट कार्य करणारे १८ ग्रामसेवक आणि स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त १० ग्रामपंचायतींना आज जिल्हा
परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गावातल्या राजकारणात
भाग न घेता सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास घडवून आणण्याचं आवाहन देवयानी डोणगावकर
यांनी केलं.
****
शेतीचा पोत सुधारुन गरजेप्रमाणे
खताची मात्रा देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन
लातूरचे खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी केलं आहे. जागतिक
मृदा दिनाच्या निमित्तानं आज मांजरा कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याचं
उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना मृदा
आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातही तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात
मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.
****
जालना जिल्ह्यातल्या खरपुडी कृषी
विज्ञान केंद्रातही शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच
जमिनीच्या सुपीकतेनुसार पिकांचं नियोजन करावं, असं आवाहन जालना जिल्ह्याचे कृषी अधीक्षक
दशरथ तांभाळे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद शहरातल्या जुना बाजार इथल्या
मुख्य टपाल कार्यालयात आजपासून आधार नोंदणी केंद्र सुरू झालं आहे. औरंगाबाद शहरातल्या
नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन औरंगाबाद विभागाचे प्रवर अधीक्षक ए एस रसाळ यांनी
केलं आहे.
****
जालना जिल्हा परिषदेतला कनिष्ठ सहाय्यक
लिपिक रानबा भाग्यवंत
याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ अटक केली. सेवानिवृत्त
आरोग्य सेविकेच्या रजा रोखीकरणाचं देयक अदा करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या विविध
मागण्यांसंदर्भात आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता
कल्याणकारी मंडळ स्थापन करणं, मोक्याचे ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देणं, शासकीय
घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यासाठी राखीव कोटा ठेवण्यासह
अन्य मागण्याचं निवेदन कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आलं.
****
आकाशवाणी दिल्ली केंद्राचे माजी
वृत्तनिवेदक डॉ गोपाळ मिरीकर यांचं आज अहमदनगर इथं निधन झालं, ते १९६२ ते ७२ या काळात
दिल्ली इथं वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते.
****
No comments:
Post a Comment