आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
1 जानेवारी २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचं वेतन आणि सेवा शर्ती
दुरूस्ती विधेयक तसंच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक आज चर्चा
आणि मंजुरीसाठी लोकसभेत मांडली जाणार आहेत. मुस्लिम महिला विवाह अधिकार आणि
संरक्षण विधेयक २०१७ राज्यसभेत उद्या मांडलं जाण्याची शक्यता संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यात आवाजी मतदानानं
मंजूर केलं आहे. दिवाळखोरी विधेयकही लोकसभेत मंजूर झालं असून, ते राज्यसभेकडे
पाठवण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा हा शेवटचा आठवडा असून, संसदीय
कामकाज पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.
****
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग या विधेयकामधल्या काही
तरतुदींच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संस्था - इंडीअन मेडीकल असोसिएशन तर्फे आज काळा
दिवस पाळला जाणार असून, सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देशव्यापी बंद पुकारण्यात
आला आहे. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे विधेयक आज संसदेत चर्चेसाठी मांडलं जाणार आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा-कोरेगाव इथं काल दगडफेकीची घटना
घडल्यानं राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत बस स्थानकाजवळ
उभ्या असलेल्या दोन जीप काल रात्रीच्या सुमारास जाळण्यात आल्या, तसंच एसटी बसवरही दगडफेक
करुन काचा फोडण्यात आल्याचं वृत्त आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वसमत बंदचं आवाहन
करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमृतसरहून येणारी सचखंड एक्स्प्रेस उत्तर भारताल्या धुक्यामुळे
दहा तास उशिरा धावत असल्यामुळे नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही गाडी आज नांदेडहून
दुपारी साडे बारा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
ही माहिती दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरण कालवा तसंच वांबोरी
चारीची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन
देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हाळगाव इथं पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमीपूजन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
*****
No comments:
Post a Comment