Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
तीन दिवसांच्या सुटीनंतर संसदेचं कामकाज आज पुन्हा सुरू
झालं. लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काश्मीरमध्ये परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा
निषेध करत, हुतात्मा जवानांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव वाचला. सदनानं हुतात्म्यांना
श्रद्धांजली अर्पण केली. लोकसभेत गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी काश्मीरमध्ये परवा
झालेला हल्ला आणि तो मोडून काढण्यासाठी सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईबाबत निवेदन केलं.
राज्यसभेत शून्य काळात नद्यांसह जलस्रोतामध्ये वाढत असलेल्या
प्रदुषणाबद्दल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेचं लक्ष वेधलं. हुसेन दलवाई यांनी
राज्यातल्या शाळांची स्थिती आणि प्रवेश प्रक्रियेचा मुद्दा मांडला.
****
क्रेडीट कार्ड, भीम कार्ड, किंवा अन्य कार्डाच्या आधारे
केल्या गेलेल्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर आता कुठलंही शुल्क आकारलं जाणार
नाही. ही व्यवस्था कालपासून लागू झाल्याचं अर्थ मंत्रालयानं कळवलं आहे. यामुळे सरकारला
दोन हजार ५१२ कोटी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक वैद्यकीय क्षेत्रातल्या
लोकांसाठी तसंच देशासाठी लाभदायक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी
म्हटलं आहे. राज्यसभेत आज समाजवादी पक्षाचे
खासदार नरेश अग्रवाल यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. या विधेयकाच्या
विरोधात देशभरात आज भारतीय वैद्यकीय संस्थेनं बंद पुकारला असून, आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांशी
संपर्क ठेऊन असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
नागालँडला आणखी सहा महिन्यांसाठी ‘अशांत क्षेत्र’ घोषित
करण्यात आलं आहे. गृहमंत्रालयानं यासंदर्भात एक पत्रक जारी करून ही माहिती
दिली
नागालँड मधली परिस्थिती अस्थिर आणि धोकादायक
असून नागरी प्रशासनाला सशस्त्र दलांची मदत आवश्यक असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. राज्यभरात विविध ठिकाणी हत्या, लूट, खंडणीचे
प्रकार सुरु असल्यामुळे सशस्त्र दलांना विशेष अधिकार देणाऱ्या कायद्यानुसार
येत्या जून अखेरपर्यन्त नागालँड मध्ये सशस्त्र दलांची कारवाई सुरू राहील असं
गृहमंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. या
कायद्यामुळे सुरक्षा दलांना कुठेही कारवाई करण्याचे आणि पूर्वसूचने शिवाय
कुणालाही अटक करण्याचे आधिकार आहेत.
****
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं काल झालेल्या घटनेचे
आज राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटले. औरंगाबाद शहरातल्या बहुतांशी बाजारपेठा, शैक्षणिक
संस्था, महाविद्यालयं तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातलं कामकाज बंद
होतं. शहरात सकाळी अकरा वाजता जमावबंदीसाठीचं कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आल्याचं
पोलिस नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलं.
जालना - सिंदखेडराजा मार्गावर नंदापूर फाट्यावर एका बसवर
दगडफेक झाल्यामुळे या मार्गावरची वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. जालना- औरंगाबाद
मार्गावर रास्तारोको करत, वाहनांवर दगडफेकीचा प्रकार घडला. भोकरदन नाका परिसरातही बसच्या
काचा फोडल्याचं वृत्त आहे. शहरात चोख बंदोबस्त असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं
दिली आहे.
धुळे शहरातही काल रात्री एसटी बसेस वर दगडफेक तसंच तोडफोडीच्या
पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातही काही ठिकाणी दगडफेक झाल्याचं
वृत्त आहे. सर्वत्र पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत
हमालांनी काम बंद केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं बंद पाळण्यात येत असून, शहरात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून एक संदेश फेरी काढण्यात
आली. बुलडाणा शहरातही या घटनेचे पडसाद उमटल्याचं वृत्त आहे.
*****
मराठवाडा आणि विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस
पिकावर बोंड अळीचा प्रभाव झाला असून, त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के
परिणाम झाला आहे. कृषी विभागानं केलेल्या पाहणीनुसार सुमारे २५ हजार हेक्टर वरील पीक
बोंड अळीमुळे बाधीत झालं असून, नांदगाव आणि बागलाण मध्ये शेतकऱ्यांनी कापसाची रोपे
उपटून टाकल्यानं कृषी विभागाला पंचनामे करणं अवघड झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
शासकीय रुग्णालयांमधून वैद्यकीय उपचार सेवांच्या शुल्कात
वाढ झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शंनं केली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात
अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*****
No comments:
Post a Comment