Wednesday, 3 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø भीमा कोरेगाव घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; दलित आणि डाव्या संघटनांचं आज महाराष्ट्र बंदच आवाहन

Ø हिंदू एकता आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

Ø मराठवाड्यातही मोर्चे, दगडफेक, लाठीमारच्या घटना; पोलिस बंदोबस्त वाढवला. शांततेचं आवाहन

Ø उडीद आणि मुगाची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी बारा जानेवारीपर्यंत मुदतवाढ

आणि

Ø बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याचा राज्य सरकारचा विचार

*****

 पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं घडलेल्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करून घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणात मरण पावलेल्या एका तरूणाची हत्या झाल्याचं मानून, गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल, तसंच मृत तरुणाच्या कुटुंबाला दहा लाख रुपये मदत दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या घटनेत ज्या वाहनांचं नुकसान झालं, त्यांनाही मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या ठिकाणी तैनात पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं ते म्हणाले. राज्यात जातीय तणाव निर्माण होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...

 कुठलाही जातीवादाचा प्रकार याच्यात होणार नाही.अशा प्रकारची दक्षता घेतली पाहिजे. अशा प्रकारे जो कारवाई करेल.पोलिस त्याच्यावर कडक कारवाई करतील.सोशल मिडीयातून जर कोणी अफवा पसरवत असेल. तर त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल.विविध राजकीय पक्षाच्या आणि संघटनेच्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकाराचं कोणीही व्यक्तव्य करू नये. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी आम्ही जातो आहोत. आणि निश्चितपणे त्यातलं सत्य हे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल.आणि म्हणून सर्वांनी शांतता बाळगावी. 



      दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. भीमा कोरेगाव इथली घटना टाळण्यात राज्य शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ पुकारलेला हा बंद शांततेनं पाळावा, असं आवाहन त्यांनी केलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. डाव्या आणि अन्य दलित संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. हिंदू एकता आघाडी आणि शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भिमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली आणि हिंसाचार पसरवल्याचा आरोप डॉक्टर आंबेडकर यांनी यावेळी केला.

 या प्रकरणी हिंदू एकता आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरूद्ध पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधिक कायदा, दंगल आणि खूनी हल्ला प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेचे काल राज्यभरात पडसाद उमटले. औरंगाबाद इथं काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली, जमावाला नियंत्रित करण्यासाठी सिद्धार्थ नगर इथं लाठीमार करावा लागला, तर उस्मानपुरा इथं अश्रुधुराचा वापर करावा लागल्याचं प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे सांगितलं. शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून, नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले ....

 त्याचा पडसाद आपल्याकडे उमटून आपल्या इथलं सोशल फॅब्रीक अशांत होऊ नये याकडे आपण लक्ष्य द्यावं अशा प्रकारचे जर कोणी रूर्मस पसरवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या वर कृपया करून कोणी विश्वास ठेऊ नये.



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड भागातही या घटनेचे पडसाद उमटले. पैठण इथं नाथमंदिरावर दगडफेक करण्यात आली तर गंगापूरमध्ये बंद पाळण्यात आला.

 परभणी इथं या घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चेकऱ्यांनी रेल्वे स्थानकासह काही भागात दगडफेक करत, वाहनांची नासधूस केली. बसेसवर दगडफेक झाल्यानं, जिल्ह्यात काही काळ बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. बीड जिल्ह्यातही २५ वाहनांचं जमावानं नुकसान केलं. अंबाजोगाई, पाटोदा आणि वडवणी इथं निषेध मोर्चे काढण्यात आले. परळीत बंद पाळण्यात आला.

 जालना शहरातल्या नूतन वसाहत भागात जमावानं वाहनांवर दगडफेक करून एका खाजगी वाहनाला आग लावली. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. एसटी बसवर अनेक ठिकाणी दगडफेक झाल्यानं, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त असून, पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतलं आहे.

 लातूर जिल्ह्यात एकूण आठ राज्य परीवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीच्या घटनेनंतर महामंडळानं तात्काळ बससेवा बंद केली. या दगडफेकीत एक बस चालक किरकोळ जखमी झाला. शहरातल्या कांही भागात दुपारपर्यंत दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवले होते. मात्र सांयकाळी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. 

 हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून औंढा नागनाथ शहर बंद होतं. कळमनुरीहून सुटणारी बससेवाही बंद होती. वसमतमधेही या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. नांदेड इथं काल बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्याच्या इतर भागातही पडसाद उमटले.

 नाशिक शहरात नाशिकरोड आणि जेलरोड परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बस तर सातपूरच्या आयटीआय पुल परिसरात खासगी शाळेची बस आणि दोन खासगी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबई, भिवंडी, ठाणे, कोल्हापूर, धुळे, नाशिक, वाशिम, अहमदनगर सह अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही शांतता बाळगण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन केलं आहे.

रम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आजची परीक्षा रद्द केली आहे. काही शाळांनीही सुटी जाहीर केली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 राज्यात शेतकऱ्यांकडच्या उडीद आणि मुगाची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारनं बारा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य शासनानं मुदतवाढीची मागणी केली होती, या खरेदीला दुसऱ्यांदा  मुदतवाढ मिळाल्याचं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

****

 राज्यात औद्योगिक प्रकल्प बंद पडल्यामुळे विनावापर पडून असलेल्या जमिनींचा वापर परवडणाऱ्या घरांच्या बांधकामांसाठी तसंच रोजगार निर्मिती  करण्यासाठी, या जमिनींच्या वापर बदल संदर्भातलं धोरण निश्चित करण्यास राज्य मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. या निर्णयानुसार जमिनीच्या वापराबाबत बदल करण्यासाठी चालू वर्षाच्या बाजार मूल्यानुसार जमिनीच्या मूल्यांकनाच्या रकमेच्या चाळीस टक्के रक्कम ही अधिमूल्य म्हणून वसूल करण्यात येणार आहे

****

 औषधांचा साठा संपलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्नित रुग्णालयांना शासनानं विहित केलेल्या अस्तित्वातील दर करारानुसार खरेदी करण्याची परवानगी देण्यास तसंच संपुष्टात आलेल्या औषधी विषयक बाबींच्या खरेदीसाठीच्या दर करारास मुदतवाढ देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तातडीच्या खरेदीसाठी या दर करारांना मुदतवाढ देण्यात देण्यात आली आहे.

****

 संरक्षित वन क्षेत्रातून स्वत:हून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना जमिनीच्या  बाजारभावाच्या चार पट मोबदला देण्याचा  निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे विभागांना देण्यात आलेला निधी खर्च करुन विकास कामं विहीत मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. संत एकनाथ रंगमंदीर आणि संत तुकाराम महाराज नाट्यमंदीर यांच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

 नांदेड जिल्ह्यातल्या नायगावच्या नाम फाऊंडेशननं थंडीच्या ब्लँकेट्स वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. या ऊपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून नायगाव, नरसी, बस स्टँड, बिलोली बस स्टँड, बिलोली तहसिल परिसरात जाऊन थंडीनं कुडकुडणाऱ्या निराधार आणि गरजू लोकांना काल १० ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं.

****

 परभणीच्या सेलू इथल्या नूतन महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो- खो स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली. या स्पर्धेत जवळपास  ४५ संघ सहभागी झाले आहेत.

*****

No comments:

Post a Comment