▼

Wednesday, 17 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जानेवारी २०१८ दुपारी १.०० वा.

****

 हैदराबाद मुक्तिसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोरीकर यांचं काल सायंकाळी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं. आज सकाळी स भु शिक्षण संस्थेच्या प्रांगणात बोरीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी समाजाच्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी गर्दी केली होती. दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या कन्या सुरभि देवी वाणी, प्रसिद्ध गायक पंडित नाथराव नेरळकर, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, विधीज्ञ जवाहर गांधी, यांच्यासह अनेक मान्यवरांनी बोरीकर यांचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बोरीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या सायंकाळी स भु संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं गेल्या आठवड्यात प्रक्षेपित केलेल्या कार्टोसॅट द्वितीय श्रेणीतल्या सातव्या उपग्रहानं काम सुरू केलं आहे. या उपग्रहानं, मध्यप्रदेशातल्या इंदूर शहराचं छायाचित्र, इस्रोच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं आहे. या उपग्रहानं पाठवलेल्या छायाचित्रांचा शहरी तसंच ग्रामीण विकासासाठी तसंच भौगोलिक माहितीवर आधारित इतर यंत्रणांसाठी लाभ होणार आहे.

****

 भारत दौऱ्यावर आलेले इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सारा नेतन्याहू आज गुजरातमध्ये अहमदाबाद दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर सुमारे नऊ किलोमीटर अंतराच्या पथ प्रदर्शनाचं अवलोकन केलं. देशभरातल्या विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे सजीव देखावे या मार्गावर उभारण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांनी, साबरमती आश्रमात जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना श्रध्दांजली अर्पण केली. आय क्रिएट या संस्थेच्या अहमदाबाद मधल्या नवीन संकुलाचं उद्घाटन नेतन्याहू यांच्या हस्ते आज होणार असून, साबरकांठा जिल्ह्यात वडदर इथल्या भाजीपाला केंद्रालाही ते भेट देणार आहेत.

****

 मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ - व्यापम मध्ये झालेल्या घोटाळयाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं मध्यप्रदेशचे माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा, त्यांचा विशेष कार्य अधिकारी ओ.पी.शुक्ला आणि अन्य ९३ जणांविरुध्द आरोपपत्र दाखलं केलं आहे. भोपाळ इथल्या विशेष न्यायालयात दाखल या आरोपपत्रात, परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदी तसंच ८३ उमेदवार, सहा मध्यस्थ, दोन अन्य अधिकारी आणि मुख्य प्रणाली विश्लेषक यांचीही नावे आहेत.

****

 देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या योजनेचा भाग म्हणून, सरकारनं तब्बल एक लाख २० हजार कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचं ठरवलं आहे. गेल्या आठवड्यात नोंदणी रद्द करण्याच्या दृष्टीनं केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उद्योग व्यवहार राज्यमंत्री पी.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, अनुपालन न करणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले. यापूर्वी सुमारे दोन लाख २० हजार कंपन्यांची नोंद काढून टाकण्यात आली असून तीन लाख संचालकांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे.

****

 देशात उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या ६५ व्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. शैक्षणिक संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यावर सरकारचा भर आहे, असं ते म्हणाले. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जात असून, गरजू विद्यार्थी कर्ज आणि शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध क्षेत्रांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

 संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही राज्यांमध्ये बंदी घातल्याच्या विरोधात या चित्रपटांच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत बंदी आणली आहे.

****

 राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं ठाण्याहून अटक केलेल्या सात संशयीत नक्षलवाद्यांना मुंबईच्या विशेष न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे नक्षलवादी आपल्या कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप एटीएसनं केला आहे. 

*****

***

No comments:

Post a Comment