Monday, 1 January 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.01.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतकरी कर्जमाफी तसंच शेतमाल हमीभाव खरेदीसाठी राज्य सरकारनं १४ हजार २४० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात ही माहिती देण्यात आली. गेल्या पावसाळी अधिवेशनात सकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती, या योजनेसाठी सुमारे ३४ हजार २० कोटी रुपये निधीची आवश्यकता भासेल, असं सरकारनं यापूर्वी म्हटलं होतं. त्यापैकी मोठा भाग कर्जमाफीपोटी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याचं सहकार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. आताची कर्जमाफीची ही रक्कम नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली.

****

राज्यात विदर्भाच्या काही भागात तापमानात घट झाली आहे. आज सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यातही थंडी कायम आहे. आज उस्मानाबाद इथं नऊ पूर्णांक तीन, नांदेड १२ आणि औरंगाबाद इथं १२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं, नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएम प्रथम सत्राच्या परीक्षेत अकौटिंग फॉर मॅनेजर या विषयाची आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आज सकाळी परीक्षा सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच शहरातल्या वसंतराव नाईक महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका वॉट्सअप ग्रूपवर आल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, आजच्या विषयाची परीक्षा रद्द केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक दिगंबर नेटके यांनी दिली.

****

बुलडाणा जिल्हयात तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले. साखरखेर्डा जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर लोणार तालुक्यात बिबी जवळ जीप आणि दुचाकीत झालेल्या अन्य एका अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. तिसरी घटना चिखली मेहकर मार्गावर घडली. बुलडाणा इथून लोणार कडे जाणाऱ्या एसटी बसचा सहारा फाट्याजवळ स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे झालेल्या अपघातात १२ प्रवाशी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी मदत करण्याचं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी केलं आहे. धारुर इथं मिशन दिलासा अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ५० कुटुंबियांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेळी वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात धारुर तालुक्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना छोट्या उद्योगांचं तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठीचं साहित्य संमेलन बीड इथं होणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं आहे. बीड इथं आज व्यसनमुक्ती अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं सातत्यानं आयोजन करुन, ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज खासगी समारंभासाठी जालना इथं येत आहेत. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते जालन्याकडे प्रस्थान करतील. जालन्याहून रात्री सुमारे साडे आठ वाजेदरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादमार्गे मुंबईकडे रवाना होतील.

****

चौथ्या झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथालेखक प्राचार्य भगवान देशमुख यांची निवड झाली आहे. येत्या १३ जानेवारीला जालना जिल्ह्यात जाफराबाद इथं होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. कवयित्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

****

यंदाचा रणजी चषक विदर्भाच्या संघानं पटकावला आहे. इंदूर इथं झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघानं दिल्ली संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. विदर्भाच्या संघानं पहिल्यांदाच रणजी चषक जिंकला आहे. 

****

औरंगाबाद इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो २०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार आहेत. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे.

//*******//

No comments:

Post a Comment