▼

Thursday, 18 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.01.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०१७’ साठी १८ मुलांची निवड करण्यात आली आहे. यात सात मुली असून, तीन मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार दिले जाणार आहेत. जुगाराच्या अवैध धंद्याचा छडा लावल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या नाजियाला ‘भारत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर पाण्यात बुडणाऱ्या दोन युवकांना वाचवताना स्वत:चे प्राण गमावलेल्या नेत्रावती चव्हाणला ‘मरणोत्तर शौर्य पुरस्कार’ दिला जाणार आहे. नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ याचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

इंटरनेटवर अश्लील छायाचित्रं आणि चित्रफितींची देवाणघेवाण वाढली असल्याची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे. याला आळा घालण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि सायबर पोलीस दल स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या नव्यानं निर्माण झालेल्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाच्या अंतर्गत ही यंत्रणा काम करेल. यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचे आणि भारतीय कायदा डावलून अश्लील गोष्टी दाखवणाऱ्या वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे निर्देश गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रकरणात लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईदसह १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात दाखल या आरोपपत्रात एनआयएनं तपास सुरु ठेवण्याची परवानगी मागितली आहे.

****

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेले धुळ्याचे जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारच्या वतीनं एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. भामरे यांनी आज भदाणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या सोनई इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या आरोपींना नाशिक सत्र न्यायालय येत्या २० तारखेला शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयानं सहा आरोपींना दोषी ठरवलं असून एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. शिक्षेच्या युक्तिवादावेळी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दोषींना देहदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

आंतरजातीय प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळ गणेशवाडी शिवारात विठ्ठलवाडी इथं तीन तरुणांची हत्या करण्यात आली होती.

****

सोलापूर रेल्वे विभागात इंजिनीअरिंग ब्लॉक मुळे पुणे-निझामाबाद पॅसेंजर गाडी २३ जानेवारी पर्यंत मनमाड ते पुणे रद्द करण्यात आली आहे. ही गाडी निझामाबाद ते मनमाड आणि मनमाड ते निझामाबाद अशी धावणार आहे. तर नांदेड-दौंड पॅसेंजर गाडी २१ जानेवारी पर्यंत कोपरगाव ते दौंड दरम्यान रद्द करण्यात आली असून, ही गाडी नांदेड ते कोपरगाव आणि कोपरगाव ते नांदेड अशी धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. 

****

२८ जानेवारी आणि ११ मार्च या दिवशी देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून, या मोहिमेत जालना जिल्ह्यातला शून्य ते पाच वयोगटातला एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत. जालना इथं पल्स पोलिओ समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

****

धुळे इथले कॉंग्रेसचे माजी मंत्री अमरीश पटेल आणि जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह १० जणांच्या निवासस्थानी काल सकाळपासून सुरु असलेली प्राप्तीकर विभागाची तपासणी आज दुसऱ्या दिवशी सुरुच आहे. या पथकानं पाच बँक लॉकर सील केल्याचीही माहिती समोर येत आहे. याशिवाय उद्योगसमूहाच्या बँकेतील खात्यांचीही तपासणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दोन दिवसीय डॉ.मोईन शकीर व्याख्यानमालेला सुरुवात झाली. या व्याख्यानमालेत आज ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचा संबंध’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं. सर्व चळवळी या राज्यसंस्थांसाठी मार्गदर्शक होत्या, परंतु सद्यस्थितीत चळवळींचा दबाव राज्यसंस्थांवर नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

राज्यात विदर्भाच्या काही भागात तापमानात घट झाली आहे, तर उर्वरित भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. नाशिक १२ पूर्णांक सहा, अहमदनगर १२ पूर्णांक आठ, परभणी १४ पूर्णांक एक, तर औरंगाबाद इथं १५ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

****

No comments:

Post a Comment