▼

Wednesday, 14 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.02.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.

****

 तरुणांचा अतिरेकी संघटनांकडे ओढा चिंताजनक असल्याचं, भारतीय लष्करानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी, सीमेवर यश मिळत नसल्याने सैन्य छावण्यांवर दहशतवादी हल्ले होत असल्याचं नमूद केलं. सैनिकांच्या बलिदानाला सैन्यदल कधीही जातीय रंग देत नसल्याचं सांगत, सामाजिक संपर्क माध्यमातून दहशतवादाला खतपाणी मिळत असून, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना जेरबंद करणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****

 देशवासीयांनी एकजूट होऊन फुटीरतावादी शक्तींशी सामना केला पाहिजे, असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. आज नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ जय मिट्टी रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. देशाला मजबूत करणं, हा या रथयात्रेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.२०२२ पर्यंत नवा भारत निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असंही राजनाथसिंह यांनी यावेळी म्हटलं.

****

 इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी तीन दिवसांच्या भेटीसाठी उद्या भारतात येत आहेत. या भेटीत ते राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेतील. दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी चर्चाही होणार आहे. आपल्या या दौऱ्यात रूहानी हैदराबादलाही भेट देणार आहेत.

****

 आधार पत्र नसल्याच्या कारणावरून कुठल्याही लाभ किंवा सेवेपासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, हे राज्यसरकारांनी सुनिश्चित करावं, असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, यांनी म्हटलं आहे. आधार क्रमांकामुळे सुशासनात पारदर्शिता येते आणि बचतही होते, मात्र ते नसल्यासही नागरिकांना सगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळायलाच हवा, असं प्रसाद यांनी नमूद केलं.

****

 महिलांचं आरोग्य आणि स्वच्छता सुविधेसाठी केंद्रसरकार देशात ठिकठिकाणी सॅनिटरी पॅड्स वितरण केंद्रं उभारणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल ही माहिती दिली. सार्वजनिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही सुविधा उभारण्यात येणार असून, यातून सुमारे साठ हजार महिलांना रोजगार मिळेल, असं प्रसाद यांनी सांगितलं.

****

 चौथ्या गेटवे साहित्य संमेलनाला येत्या बावीस तारखेपासून मुंबईत सुरुवात होत आहे. प्रादेशिक भाषांमधल्या साहित्यासाठीचा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वात मोठा मंच, अशी ओळख असलेल्या या उत्सवाचं या वर्षीचं घोषवाक्य,‘भारतीय साहित्यातील स्त्री-शक्ती‘, असं आहे. सतरा प्रादेशिक भाषांमधून लिहिणाऱ्या पन्नास लेखिका यात सहभागी होणार असून, यात ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या ओडिया लेखिका प्रतिभा राय, यांच्यासह अनेक साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या लेखिकांचा समावेश असणार आहे. नीना कुळकर्णी, प्रज्ञा दया पवार, मलिका अमर शेख या मराठी लेखिकाही यावेळी आपले विचार मांडणार आहेत.

****

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं जालना इथल्या शिवशाही प्रतिष्ठान या संस्थेनं राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना शिवशाहीरपीआर shivashahipr@gmail.com  या ईमेल आयडीवर येत्या एकोणीस तारखेपर्यंत कविता पाठवता  येणार आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या एक हजार एक कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार असल्याचं संस्थेनं कळवलं आहे.

****

 सोलापूर जिल्ह्यातल्या तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि एकशे पासष्ट जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी संध्याकाळपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. यात तेरा सरपंचपदांसाठी एकोणसत्तर, सदस्यपदांसाठी  चारशे सहासष्ट तर पोटनिवडणुकीसाठी तीनशे अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 एकदिवसीय किक्रेट मध्ये आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. काल दक्षिण आफ्रिका संघाला हरवून सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारताच्या क्रमवारीत ही सुधारणा झाली. या मालिकेतल्या सहाव्या आणि अखेरच्या सामन्याच्या निकालाचा या क्रमवारीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातला कसोटी संघही जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरच आहे. टी ट्वेंटी किक्रेटच्या क्रमवारीत मात्र भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

*****

***


No comments:

Post a Comment