▼

Thursday, 15 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी  २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø  अवकाळी पाऊस आणि गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे २०० कोटी रूपयांची मदत मागणार

Ø  दिव्यांग व्यक्ती आणि वरिष्ठ नागरिकांसाठी राज्यातल्या अकरा शहरांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

Ø  तुळजाभवानी देवस्थानच्या ईनामी जमिनी बळकावण्या प्रकरणी महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

Ø  ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक यशवंत देशमुख आणि डॉ.दिलीप घारे यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील पुरस्कार जाहीर

आणि

Ø  परभणीचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शाहीर प्रभाकर वाईकर यांचं निधन



*****

 अवकाळी पाऊस आणि गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे २०० कोटी रूपयांची मदत राज्य सरकार मागणार असल्याचं, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. गेल्या चार दिवसात गारपीटीमुळे राज्यातल्य, १ लाख, ९० हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात पंचनाम्यासह अंतिम अहवाल अपेक्षित असल्याचं ते म्हणाले.  फळपीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेतून मदत दिली जाणार आहे, असं फुंडकर यांनी सांगितलं.

****

 गारपीटीला ७२ तास उलटून गेली आहेत, अजूनही नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचा आरोप करत, सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अस मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते काल वार्ताहरांबरोबर बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल परभणीत गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी भाजपा सरकार हे केवळ फसव्या घोषणा करणारं सरकार असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळत नसल्याचा आरोप केला.

****

 दिव्यांग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक तसंच समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी अकरा शहरांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या शहरांमध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, परभणी आणि लातूर या शहरांचा समावेश आहे.

 ना- अधिसूचित झालेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांवर, एकात्मिक औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक धोरण-२०१३ नुसार स्थापन झालेली, विशेष आर्थिक क्षेत्रं ना अधिसूचित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होण्यासाठी एकात्मिक औद्योगिक क्षेत्रास अधिकच्या सोयीसुविधा, आणि सवलती देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या उद्योगांना किमान क्षेत्रफळ, प्रवेश रस्ता, मुद्रांक शुल्क, वीज खरेदी आणि चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये सवलती मिळणार आहेत.

 राज्यात एकात्मिकृत शहरं विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या, विशेष नगर वसाहत योजनेच्या विनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या सुधारणांमुळे विशेष नगर वसाहतींचे प्रकल्प अधिक लोकाभिमुख आणि व्यवहार्य होण्यास मदत होणार आहे.

****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजाभावनी देवस्थानच्या मालकीच्या ईनामी जमिनी बळकावण्याच्या प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्याचा आदेश दिला आहे. देवस्थानच्या मालकीच्या ईनामी जमिनी बळकावल्या संदर्भातला चौकशी अहवाल उच्च न्यायालयासमोर मागवावा, आणि सर्व प्रकारची चौकशी करुन संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका हिंदु जनजागरण समितीनं न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले. देवस्थानाला मिळालेल्या अनेक ईनामी जमिनी काही लोकांनी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं बळकावल्या आहेत. यासंदर्भात विधी आणि न्याय विभागानं चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला आहे. याचिकेची पुढील सुनावणी ५ मार्च २०१८ रोजी होणार आहे.

****

 ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून बडोदा इथं प्रारंभ होत असून, आज सायंकाळी बडोदा शहरातून ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे.

*****

       हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक यशवंत देशमुख आणि डॉ.दिलीप घारे यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या ३० वर्षात  नाट्यक्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. येत्या १२ मार्चला औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ.ना.गो.नांदापूरकर सभागृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

 औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा स्वातंत्र्य सैनिक वि.वा. देसाई स्मृती पुरस्कार,  भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते काल औरंगाबादच्या वेद प्रतिष्ठानला संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी कवी कालिदास आणि परंपरा या विषयावर डॉ. देखणे यांचं व्याख्यान झालं. परदेशात कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, मात्र भारतात त्यांच्या साहित्याचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

 औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात सुरू असलेल्या फुले- शाहू- आंबेडकर व्याख्यानमालेचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला. सामान्य माणसाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, राजर्षि शाहू महाराज आयुष्यभर लढले, असं  मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

 ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शाहीर प्रभाकर वाईकर यांचं काल वृद्धापकाळानं परभणी इथं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये सहभागी झालेल्या वाईकर यांनी शाहिरीतून जनजागृती करण्याचं कार्य केलं. जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. आज सकाळी ११ वाजता परभणी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जातील.

****

 बीड जिल्ह्यातल्या नारायण गडाच्या २५ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली असून, आज या आराखड्यातल्या विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

****

 गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे काल बीड जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयांसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना त्वरीत मदत न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.

 दरम्यान, बोंड अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ  जमा करण्यात यावी, या मागणीसाठी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातल्या सौदाना इथं आज सायंकाळी आक्रोश परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस, आणि वादळी वाऱ्यामुळे  फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून, आपदग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, धिरज  देशमुख यांनी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे. काल याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

*****

***




No comments:

Post a Comment