▼

Thursday, 15 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५  फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००

****

 विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी घेतलेल्या पुस्तकांमध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते. बाल नचिकेता आणि भगवान व्यास या पुस्तकांमध्येही कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचं ते म्हणाले. पुण्याच्या महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या आशय समितीकडून या पुस्तकांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी घेतल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यासंदर्भात नाशिक इथं आयोजित शासकीय बैठकीत ते काल बोलत होते. या मार्गामुळे राज्यातल्या २४ जिल्ह्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

 वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या, राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - ‘नीट’चं केंद्र परभणी जिल्ह्यात सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सागितलं आहे. असं केंद्र सुरू करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांनी केली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही परभणी इथं नीट केंद्र सुरू करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना केल्या असल्याचंही लोणीकर यांनी सांगितलं.

****

 दिव्यांग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक तसंच समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी अकरा शहरांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या शहरांमध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, परभणी आणि लातूर या शहरांचा समावेश आहे.

****

 ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून बडोदा इथं प्रारंभ होत असून, आज सायंकाळी बडोदा शहरातून ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे.

*****

***






No comments:

Post a Comment