Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
सक्तवसुली संचालनालयानं हिरे व्यापारी
नीरव मोदी याच्याविरुद्ध २८० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला
आहे. नीरव मोदी यांच्याविरोधात बँकेनं केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली
असून, या रकमेचा उपयोग बेकायदेशीर संपत्ती किंवा काळ्या पैशासाठी केला आहे का, याचा
तपास संचालनालय करत आहे. नीरव मोदीनं पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार कोटी रुपयांचा घोटाळा
केल्याची तक्रारही काल केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडे दाखल झाली आहे. त्यानं या
बँकेच्या एका शाखेकडून परदेशात कर्जपुरवठा करण्यासाठी बनावट करारपत्र मिळवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. काही
निवडक खातेधारकांच्या हितासाठी मुंबईतल्या एका शाखेत अनधिकृत व्यवहार झाल्याचं
बँकेच्या लक्षात आलं. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं १० अधिकाऱ्यांना
निलंबित केलं आहे. हे स्वतंत्र प्रकरण असून, इतर कर्जदात्यांवर त्याचा
परिणाम होणार नाही, असं आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय अरुणाचल प्रदेशच्या
दौऱ्यावर असून, त्यांनी इटानगर इथं दोरजी खांडू राज्य सुविधा केंद्राचं उद्घाटन, तसंच
मंत्रालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेत
बोलताना पंतप्रधानांनी, देशाच्या विकासात नवीन प्रकाश पसरवण्यासाठी अरुणाचल प्रदेश
सक्षम राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
****
दरम्यान, पंतप्रधान २५
फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या ‘मन
की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४१ वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी
आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क
क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
अंमली पदार्थांच्या तस्करीचा सामना करण्यासाठी केंद्र
सरकारनं अंमली पदार्थ विरोधी योजनेला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अंमली पदार्थांच्या
आंतरराज्य आणि सीमापार वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं, हा या योजनेचा उद्देश आहे. याकामी
२०२० पर्यंत २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात सध्या
सुमारे ४० लाख लोक अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन आहेत.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर
आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्रीय अन्वेषण विभाग
- सी बी आयचा संयुक्त अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. या हत्येच्या
तपासासाठी सीबीआयनं पाच पथकं तयार केली असून, यात काही नवीन संशयितांची नावं समोर आल्याचा
दावा सरकारनं केला आहे.
****
सातव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला गोंदिया
जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव इथं आज सुरुवात झाली. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर या
संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या दोन दिवसीय संमेलनात संत साहित्य आणि सामाजिक जागृती या
अनुषंगानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, पुरस्कार वितरणही होणार आहे.
****
मराठवाड्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या
झालेल्या नुकसानीचे पंचनामे ड्रोन कॅमेराद्वारे करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
त्यांनी आज जालना तालुक्यातल्या वंजारउम्रद इथं भेट देऊन, गारपिटीमुळे मृत झालेले नामदेव
शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
ऊर्जा बचतीसाठी राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका
आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातले पथदिवे एलईडीवर आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई इथं एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड आणि
नगर विकास विभाग यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. या करारानुसार राज्यातल्या सर्व प्रमुख शहरातल्या रस्त्यांवर
सुमारे २० लाख एलईडी दिवे लावले जातील, यामधून ५०० मेगावॅट वीज बचत होणार असून, वीज देयकात किमान ५० टक्क्यांनी
घट होणार आहे.
****
औरंगाबादनजीक वाळूज औद्योगिक वसहातीतल्या सी सेक्टरमध्ये
विजय प्लास्टिक या कंपनीत आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत कंपनीच्या कामगाराच्या वडिलांचा
होळपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं.
*****
***
No comments:
Post a Comment