Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date - 19 February
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८
दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यात सर्वत्र
उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. यानिमित्त मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली इथं संसद परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र सदनात शिवजन्म सोहळा साजरा झाला, त्यानंतर परिसरातून शोभायात्रा
काढण्यात आली. मल्लखांब, दोर मल्लखांबासह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात
आली. अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीतर्फे
आज आणि उद्या नवी दिल्लीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी
किल्ल्यावर शिवजन्म सोहळा साजरा
होत आहे. या सोहळ्याला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे
आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी हजेरी लाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन
केलं.
औरंगाबाद
इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह कार्यालयातले
अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महाराजांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर
आज पहाटे झालेल्या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. सांगलीच्या
वालचंद महाविद्यालयातले हे विद्यार्थी, शिवजयंती निमित्त पन्हाळगडाहून सांगलीला शिवज्योत
घेऊन परतत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
शिर्डीच्या
साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष माजी
आमदार जयंत मुरलीधर ससाणे यांचं आज पहाटे श्रीरामपूर इथं निधन झालं, ते ६० वर्षांचे
होते. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकाभिमुख कामं
केली. १५ वर्ष श्रीरामपुरचं
नगराध्यक्षपद भुषवलेले ससाणे यांनी, विधानसभेत दोन वेळा श्रीरामपूरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. श्रीरामपूर
नगरपालिकेला त्यांनी जिल्ह्यात सर्व योजना राबवणारी आणि सक्षम नगरपालिका अशी ओळख मिळवून
दिली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर इथं अंत्यसंस्कार
करण्यात येतील.
****
येत्या जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत
संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी
प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. त्यानुसार
लातूर जिल्ह्यातल्या तीन तालुक्यातल्या पाच ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा
कार्यक्रम घेण्यात येणार आहे. औसा तालुक्यातल्या किल्लारी, देवणी तालुक्यातल्या नागतीर्थवाडी,
चवणाहिप्पगा, आणि अहमदपूर तालुक्यातल्या उन्नी जाम आणि तीर्थ या पाच ग्रामपंचायतींचा
त्यात समावेश आहे.
****
सर्व शिक्षा अभियानाला नवं स्वरूप देण्यात येणार
असून त्यावर काम सुरू असल्याचं मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशावाह यांनी सांगितलं
आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारनं शिशुवर्ग ते इयत्ता
बारावी पर्यंतच्या शिक्षणाला एकीकृत बनवण्यासाठीच्या योजनेची अंमलबाजावणी करण्यासाठी
तयारी सुरू असून, येत्या मार्च पर्यंत या संदर्भातला कायदा आणणं सरकारच्या विचाराधीन
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
‘वतन
को जानो’ या उपक्रमअंतर्गत दिल्ली भेटीवर आलेल्या काश्मीरच्या युवकांची
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या
महिन्याच्या ११ तारखेपासून काश्मीरमधले २०० युवक देशाच्या
विविध भागांना भेट देत आहेत. विविधेतून एकता हे देशाचं वैशिष्टय असून, हे
युवक त्याचं प्रतिबिंब असल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. देशभ्रमंती
दरम्यान आलेले अनुभवांची
देवाण घेवाण करून, एकतेचा संदेश पसरवण्याचं आवाहनही
त्यांनी या युवकांना केलं.
****
स्वयंपाकाच्या आरोग्यदायी पद्धती
आणि पोषक आहाराचं महत्त्व या विषयी राष्ट्रीय नेचरोपथी संस्थेनं देशात व्यापक जनजागृती
मोहीम राबवावी, असा सल्ला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिला आहे. पुण्यातल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेद्वारे
आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय नैर्सगिक
अन्न महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था लोकांना विविध
पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण देऊन रोजगार वाढवण्यासाठी मदत करेल, असं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४१वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
*****
***
No comments:
Post a Comment