Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 14 February 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
इंडियन
मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं
आज अटक केली. आरिझ खान उर्फ जुनैद असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो २००८ मध्ये झालेल्या
बाटला हाऊस चकमकीनंतर फरार झाला होता. २००८ मध्येच झालेल्या दिल्ली तसंच अहमदाबाद बॉम्बस्फोटासह
अनेक ठिकाणच्या दहशतवादी कृत्यात आरिझचा हात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
बालमजुरीमुळे
होणारं बालकांचं शोषण थांबवण्याकरता राज्य शासनानं आपल्या पर्यवेक्षक समितीचं पुनरुज्जीवन
करावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. बालमजुरी निर्मुलन, बालकामगारांचं
पुनर्वसन, तसंच बालहक्कांसंदर्भातल्या घटनात्मक तरतुदींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची
जबाबदारी या समितीवर आहे. समितीच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य
सचिवांवर सोपवावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
दिव्यांग
व्यक्ती, वरिष्ठ नागरिक तसंच समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी अकरा शहरांमध्ये विशेष
न्यायालयं स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या शहरांमध्ये औरंगाबाद, परभणी आणि
लातूरचा समावेश आहे.
गट अ आणि
गट ब मधल्या राजपत्रित तसंच अराजपत्रित पदांवर सरळसेवा आणि पदोन्नतीनं नियुक्ती करण्यासाठी
महसुली विभाग वाटप नियम-२०१५ मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
महाराष्ट्र
औद्योगिक धोरण-२०१३ अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीच्या धोरणामध्ये
सुधारणा केली जाणार असून, एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं
घेतला आहे. मंजूर योजनांच्या क्षेत्रात एकात्मिक नगरवसाहत प्रकल्प विकसित केले जाणार
असून, मुंबईत मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं
घेतला.
महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला
असून, नामांकित निर्मिती संस्थेकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
****
राज्यातल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातल्या पथदिव्यांसाठी एलईडीचा वापर केला
जाणार आहे. जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासंदर्भात एनर्जी एफिशिएन्सी
सर्व्हिसेस लिमिटेड आणि नगरविकास विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला, त्यानंतर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. येत्या डिसेंबर २०१८पर्यंत हे काम पूर्ण करण्याची
सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.
या करारानुसार
सर्व प्रमुख शहरांतल्या रस्त्यांवर सुमारे २० लाख एलईडी दिवे लावले जातील. यामुळे ५००
मेगावॅट वीज बचत होणार असून वीज बिलात किमान ५० टक्कयांनी घट होण्याची शक्यता आहे.
या दिव्यांची पुढची सात वर्षे कंपनीकडून देखभाल केली जाईल, या योजनेत सध्या मराठवाड्यातल्या
औरंगाबाद आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे.
****
शैक्षणिक
संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशाच्या वेळी पूर्ण
शुल्क भरण्याचा आग्रह धरू नये, असा आदेश शासनानं जारी केला आहे. या आदेशाचं पालन न
करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कडक कारवाईचा इशारा शासनानं दिला आहे.
****
पंजाब नॅशनल
बँकेच्या मुंबई शाखेत सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर
आलं आहे. एक आभुषण निर्मिती कंपनी, तसंच याच क्षेत्रातले व्यावसायिक निरव मोदी यांच्या
विरोधात बँकेनं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात
आणखी माहिती देण्यास मात्र यंत्रणेनं नकार दिला आहे.
****
लोकशाही
ही सातत्यानं बदलत जाणारी प्रक्रिया असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी
व्यक्त केलं आहे. आज औरंगाबाद इथल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी भाषा सप्ताहानिमित्त
आयोजित ‘भारतीय लोकशाहीसमोरील प्रतिक्रांतीचे आव्हान’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत
होते. लोकशाही म्हणजे आधुनिकता स्वीकारणं असून याचं शिक्षण कुठेही दिलं जात नसल्याची
खंतही त्यांनी व्यक्त केली.
****
समाज कल्याण
विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून दिव्यांग व्यक्तींसाठी घरकुल देण्याची
योजना असून पात्रता धारकांनी येत्या सव्वीस तारखेपर्यंत तालुका गटविकास अधिकाऱ्यांकडे
यासाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या
सभापती उर्मिला बनसोडे यांनी केलं आहे. अर्जाचा नमुना तसंच आवश्यक कागदपत्रांची यादी
गटविकास अधिकारी आणि समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे.
****
No comments:
Post a Comment