▼

Friday, 16 February 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.02.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 February 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.

****

देश प्रगती करण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणावरही तेवढाच भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ‘जागतिक शाश्वत विकास परिषद - २०१८ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियान आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. पर्यावरण रक्षणासाठी सरकारनं नमामी गंगे यासारखे अनेक उपक्रम राबवल्याचं ते म्हणाले. देशानं जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना सुरु केली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, भारत जगात पाचव्या क्रमाकांचा सौर ऊर्जा उत्पादक देश असल्याचं नमूद केलं. पर्यावरण रक्षण ही लोकवळचळ बनली पाहिजे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यावेळी म्हणाले. शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातले विचारवंत आणि जागतिक नेत्यांना एकत्र आणणं, हा या परिषदेचा उद्देश आहे. जगभरातले दोन हजाराहून जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

****

दरम्यान, पंतप्रधान नवी दिल्ली इथं देशभरातल्या विद्यार्थ्यांशी परीक्षेविषयी चर्चा करत आहेत. तणावमुक्त राहून परीक्षा देण्याचं महत्व मुलांना सांगणं हा यामागचा उद्देश आहे. देशभरातल्या सुमारे दोन हजार शाळा आणि महाविद्यालयांमधले विद्यार्थी या चर्चेत सहभागी झाले आहेत.

****

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्यावर कोणत्या एका राज्याचा आधिकार असू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. कावेरी पाणी वाटप वादावर निकाल देताना न्यायालयानं हे स्पष्टीकरण दिलं. या सुनावणीत न्यायालयानं कर्नाटक राज्याला अतिरिक्त २४ पूर्णांक ७५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरुला विश्वस्तरीय शहराचा दर्जा मिळाला असल्यामुळे या राज्याला कावेरी नदीचं जास्त पाणी मिळेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं तामिळनाडू राज्याला मिळणाऱ्या पाण्यात कपात केली असून, आता तामिळनाडूला १७७ टीएमसी इतकं पाणी मिळणार आहे. कर्नाटकमधल्या कृष्णराज सागर धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा फक्त बंगळुरुकरता पुरेसा आहे, असा दावा कर्नाटक सरकारनं केला होता.

****

सक्तवसुली संचालनालयानं पंजाब नॅशलन बँक घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदी आणि त्याचा भागीदार मेहुल चोकसी यांचं पारपत्र रद्द करण्याची मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे केली आहे. तसंच त्यांना समन्स जारी करुन दोन आठवड्यात हजार राहण्याचे आदेशही दिले आहेत. संचालनालयानं काल नीरव मोदीच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरामधल्या घरांवर छापे मारुन पाच हजार १०० कोटी रुपयांचे दागिने जप्त केले. पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेकडून परदेशात कर्जपुरवठा करण्यासाठी बनावट करारपत्र मिळवून ११ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

****

अनुसूचित जाती जमातीतल्या तरूणांनी उद्योगांकडे वळावं, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं अनेक योजना केल्या आहेत.  या योजनांचा लाभ तरूण उद्योजकांनी घेण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आज अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांसाठी एससी एसटी हब या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले,

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही महिला धोरण आणलेलं आहे.महिला उद्योजकीनं एखादी योजना,एखादा उद्योग, समोर आणला त्याची छाननी आम्ही जरूर करू. परंतू त्यांना भांडवली अनुदान आहे.व्याजाचं अनुदान आहे.ही फार मोठी सवलत आहे.राज्य सरकानं ठरवलं आहे तुम्हाला जे वर्षाला  व्याज द्यावं लागतं त्यातलं ५० टक्के व्याज सरकार देईल.

मॅग्नेटीक महाराष्ट्र, मैत्री योजना, राज्यात सुरु झालेले वेगवेगळे क्लस्टर याबद्दलही देसाई यांनी यावेळी माहिती दिली. या एकदिवसीय परिषदेत राज्यभरातले नव उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना कमी मूल्याच्या नोटा आणि नाणी स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. एक-दोन रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिल्यास लोकांची गैरसोय होते, कारण दुकानदार आणि व्यापारी देखील वस्तू आणि सेवांसाठी अशी नाणी स्वीकारायला नकार देतात, असं बँकेनं मुंबईत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या निर्देशांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांना अचानक तपासणी करण्याची सूचनाही बँकेनं केली आहे.

****

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून बडोद्यात प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी चार वाजता ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज सेंच्युरियन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत चार सामने जिंकत भारतानं आधीच विजयी आघाडी घेतली आहे.

//*********//




No comments:

Post a Comment