Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21 February
2018
Time 17.25 to
17.30
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी
२०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
पीएनबी घोटाळ्याचा स्वतंत्र तपास
करावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करणाऱ्या एका जनहित याचिकेला केंद्र सरकारनं
विरोध केला आहे. या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल दाखल होऊन तपास सुरू झालेला असल्याचं,
महान्यायवादी के.के.वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी
येत्या सोळा मार्चला होणार आहे.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयानं
सलग सातव्या दिवशी देशभरात सतरा ठिकाणी या गैरव्यवहाराशी संबंधित बोगस कंपन्यांवर धाडी
घातल्या. यामध्ये मुंबईमधल्या चार कंपन्यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या अशा कारवाईतून
पाच हजार सातशे सव्वीस कोटी रुपये मूल्याचं सोनं आणि हिरे जप्त करण्यात आल्याचं, तसंच
ही कारवाई अजून काही दिवस चालणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जिलेटीन कांड्या विक्री प्रकरणात
मुंबई पोलिसांनी जालना इथून तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांनी काही दिवसांपूर्वी
डोंबिवली भागात जिलेटीनच्या दोनशे कांड्या विकल्या होत्या. याप्रकरणी डोंबिवली पोलिस
ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या प्रकरणात जालन्याचा तीन
तरुणांचा सहभाग स्पष्ट झाल्यानं, पोलिसांनी ही कारवाई केली. यापैकी एक तरुण बारावीची
परीक्षा देत असल्यानं, परीक्षा संपताच, त्याला परीक्षा केंद्र परिसरातूनच पोलिसांनी
ताब्यात घेतलं.
****
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी
तालुक्यात आज बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. परीक्षा सुरू झाल्यावर
तासाभरातच, भातंबरे गावातल्या तांबेवाडी तांडा इथल्या वसंत कनिष्ठ महाविद्यालयातून
ही प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवरून फिरल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत माध्यमिक शिक्षक
अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विविध शासकीय कार्यालयांमध्ये
कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा शासनानं नुकताच
दिलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी औरंगाबाद आणि जालन्याच्या शासकीय कंत्राटी कर्मचारी
समन्वय समितींनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या
या कर्मचाऱ्यांचं योगदान लक्षात घेत, हा आदेश रद्द करावा, अशा मागणीचं निवेदन या समितीनं
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या
अपघातातल्या एका जखमी विद्यार्थ्याचं उपचारादरम्यान निधन झालं, त्यामुळे या अपघातातल्या
मृतांची संख्या आता दोन झाली आहे. हे विद्यार्थी आज सकाळी भोकरदन इथं बारावीची परीक्षा
देण्यासाठी जात असताना, हा अपघात घडला. अन्य एका जखमी विद्यार्थ्यावर औरंगाबाद इथं
उपचार सुरु असून, ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
सोलापूर औद्योगिक वसाहतीतला एका
टॉवेल कारखान्याला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर सूत जळून नुकसान झालं. सुदैवानं
बुधवारची साप्ताहिक सुटी असल्यानं, जीवित हानी झाली नाही. सुमारे २० टँकर पाण्याचा
मारा केल्यावर तीन तासानंतर आग नियंत्रणात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून याबाबत तपास
सुरू आहे.
****
येत्या २४ फेब्रुवारीपासून औरंगाबाद
इथं होणाऱ्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी मध्य रेल्वेनं गुलबर्गा ते औरंगाबाद आणि छत्रपती
शिवाजी टर्मिनस मुंबई ते औरंगाबाद, या मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय
घेतला आहे. गुलबर्गा तसंच मुंबईहून या गाड्या येत्या शुक्रवारी औरंगाबादसाठी निघतील,
तर सव्वीस तारखेला औरंगाबादहून परत जाणार आहेत.
****
जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं
येत्या एक मार्चपासून आठवडाभर आरोग्य शिबिरं आणि रोगनिदान शिबिरं आयोजित करण्याचे आदेश
विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. आज औरंगाबाद इथं या संदर्भातल्या
एका आढावा बैठकीत ते बोलत होते. महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात
यासाठी विभागीय महिला कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील
महिलांचा चौथा टी-ट्वेंटी सामना सेंच्युरीयन इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या
नवव्या षटकात बिनबाद ६६ धावा झाल्या होत्या. दरम्यान, पुरुष संघांदरम्यान दुसरा टी
ट्वेंटी सामना आज रात्री साडे नऊ वाजता होणार आहे.
****
No comments:
Post a Comment