Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१९ मार्च
२०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
Ø तृतीयपंथीयांना
त्यांचे अधिकार मिळवून देणारं विधेयक मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे
Ø देशाच्या ऐक्यासाठी
सर्वांनी एकत्र येण्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं आवाहन
Ø २०१९ पर्यंत राज्य
मोतीबिंदूमुक्त करण्याचा राज्य सरकारचा संकल्प
आणि
Ø भारतानं अंतिम सामन्यात बांग्लादेशवर मात करत, निदाहास चषक टी-ट्वेंटी तिरंगी
क्रिकेट मालिका जिंकली
****
केंद्रीय सामाजिक न्याय विभागानं तृतीयपंथीयांना
त्यांचे अधिकार मिळवून देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवलं
आहे. संसदीय समितीनं सूचवलेल्या नऊ शिफारशींचा या विधेयकात समावेश करण्यात आला असल्याचं
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं. त्याचबरोबर या विधेयकात
तृतीय पंथियांच्या व्याख्येतही बदल करण्यात आला आहे. याशिवाय त्यांना प्रमाणपत्र देण्याची
तरतूदही विधेयकात असून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांच्या हक्काचं रक्षण करण्याचं
दायित्व निश्चित करण्यात आलं आहे.
****
देशाच्या ऐक्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं काल पक्षाच्या ८४व्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते
बोलत होते. युवकांशिवाय देश बदलणं शक्य नसल्याचं सांगून गांधी यांनी, युवक आणि राजकारण्यांमधली
दरी हटवण्याचं काम काँग्रेस करणार असल्याचं सांगितलं. भ्रष्टाचार आणि बेरोजगारी सध्या
देशापुढचं सर्वात मोठं आव्हान असून, काँग्रेस पक्षच देशाला योग्य दिशा दाखवू शकतो,
असं त्यांनी नमूद केलं. काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नसल्याचं सांगून, त्यांनी
भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. या अधिवेशनात बोलताना माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग यांनी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
केली असून, जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीवरही नियंत्रण मिळवता आलं नसल्याचा आरोप केला.
या अधिवेशनातून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग शोधून काढणार असून, काँग्रेस पक्ष
यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
****
येत्या २०१९ पर्यंत राज्य मोतीबिंदू
मुक्त करण्याचा संकल्प केला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल एका नेत्रालयाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन
भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात मोतीबिंदूच्या आजारानं पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत
असून, सध्या राज्यात असे साडेसतरा
लाख रुग्ण असल्याचं ते म्हणाले. या सर्व रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया
करण्याची जबाबदारी शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, नागपूर
इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही काल
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २५ मार्चला रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार ‘एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य ’ या नि:शुल्क क्रमांकावर,
तसचं माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
गुढी पाडव्याचा सण काल राज्यभरात उत्साहात साजरा
झाला. घरांवर गुढी उभारुन नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण या सम्राट शालिवाहनाची
राजधानी असलेल्या शहरात काल सकाळी शोभायात्रा
काढण्यात आली. शालिवाहन राजाच्या विजयी स्तंभाची पूजा करून तिथं गुढी उभारण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर गुढी उभारण्यात
आली. तसंच देवीची विशेष महाअलंकार पूजा मांडण्यात
आली. सायंकाळी पाडवा वाचनानं सण साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्यावतीनं औरंगाबाद शहरात गुलमंडीवर खासदार
चद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. औरंगाबाद इथंही दुपारी शहराचं ग्रामदैवत
असलेल्या संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात आली. नाशिकसह मुंबई उपनगरांमध्ये विविध भागातून मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात
स्वागत यात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांनी
नृत्य आणि कवायती सादर केल्या. अनेक ठिकाणी महिलांच्या मोटार सायकल रॅली काढण्यात आल्या. तसंच पाडवा पहाट या सांगीतिक मैफिलीही
पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
औरंगाबाद जिल्ह्यातले वैजापूरचे माजी नगराध्यक्ष
डॉ. दिनेश परदेशी यांनी काल नऊ नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत परदेशी यांच्या
पत्नी शिल्पा परदेशी यांना भाजपतर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी
काँग्रेस पक्षाकडून निवडून येत शिल्पा परदेशी यांनी नगराध्यक्षपद भूषवलं होतं.
******
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातले निवृत्त प्राध्यापाक आणि जेष्ठ
स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांचे जवळचे
सहकारी प्राध्यापक म. द. पाध्ये याचं काल ठाणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ९३
वर्षांचे होते. पाध्ये यांनी विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचं तीस दशकांहून अधिक काळ अध्यापन केलं होतं.
****
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय
जनता पक्षाविरूद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. काल मुंबईत गुढी पाडव्यानिमित्त मनसेच्या
वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी, राज्यातलं भाजप सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
****
श्रीलंकेत
सुरू असलेल्या निदाहास चषक टी-ट्वेंटी तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात बांग्लादेशवर मात करत, ही स्पर्धा
जिंकली. काल झालेल्या अत्यंत
चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतानं चार गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात प्रथम
फलंदाजी करताना बांग्लादेशनं निर्धारीत वीस षटकांत आठ बाद १६६ धावा केल्या.
भारताच्या दिनेश कार्तिकनं सामन्यातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आव्हानं
पूर्ण केलं.
दरम्यान,
भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं
तीन शुन्यनं जिंकली. काल, बडोदा इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं ९८ धावांनी
भारतीय महिला संघांचा पराभव केला.
****
लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे
अंमलबजावणी झाल्यामुळं जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची उपलब्धता झाली असून जिल्हा टँकरमुक्त
झाला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. ते
काल निलंगा तालुक्यातल्या हंगरगा इथं नाला खोलीकरण आणि रूंदीकरण कामाच्या भूमीपूजन
प्रसंगी बोलत होते. भविष्यातही जिल्हा टँकरमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन
त्यांनी केलं.
****
अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला गेल्या
दोन दिवसात मोठ्या संख्येनं शेतकरी आणि नागरिकांनी भेट दिली. अंबाजोगाई इथं पहिल्यांदाच
अशा प्रकारच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment