Monday, 19 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.03.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरावरील अनौपचारिक चर्चासत्राला आज नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. या परिषदेत ५० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, या परिषदेत व्यापार वृद्धीच्या दृष्टीनं अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

****

 लोकसभेत आज मानवी तस्करी निवारण, संरक्षण आणि पुनर्वसन विधेयक २०१८, तसंच अनियमित ठेव योजनांवर बंदी घालणारं विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. या विधेयकात पीडितांचं संरक्षण आणि पुनर्वसन, दोषींना शिक्षा, प्रभावित लोकांसाठी योग्य कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक वातावरण निर्माण करण्याची तरतुद आहे. फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक आणि चिट फंड दुरुस्ती विधेयकही आज लोकसभेत पारित होण्याची अपेक्षा आहे. राज्यसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक, भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक, ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडले जाणार आहेत.  

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ मार्चला रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार ‘एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य’ या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

 शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीतर्फे आज राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर 'अन्नत्याग' आंदोलन करण्यात येणार आहे. १९ मार्च, १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या चिल गव्हाण गावातले शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आत्महत्या केली होती, ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. यापार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या समस्यांविषयी लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment