Wednesday, 21 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.03.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 March 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१   मार्च २०१ सकाळी .५० मि.

*****             

Ø  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गतच्या गुन्ह्यांमध्ये सत्यता पडताळणीनंतरच आरोपीस तात्काळ अटक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Ø  खासगी शाळांच्या शुल्क वाढी विरोधात, शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार करता येईल- शिक्षणमंत्री विनोद तावडे

Ø  रेल रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरुन विधानसभेत गदारोळ

आणि

Ø  ग्राहकांकडची थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची राज्यभर मोहिम राबवण्याचा महावितरणचा निर्णय

*****

 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत आरोपीस तात्काळ अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं, अशा प्रकरणांमध्ये अटकेपूर्वी प्राथमिक चौकशी करणं बंधनकारक असल्याचे आदेश पोलिसांना दिले. तक्रारीची सत्यता तपासल्यानंता गुन्हा नोंदवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांविरूद्ध अशा प्रकारची तक्रार आल्यास प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदवावा तसंच सक्षम धिकाऱ्यांच्या लेखी संमतीशिवाय आरोपीला अटक करू नये असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. सरकारी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं न्यायालयाला आढळून आल्यानंतर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

****

 आर्थिक आमिषातून फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी, ठेवीदार संरक्षण कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. चालू अधिवेशनात पुढच्या आठवड्यात, यासंदर्भातलं विधेयक आणलं जाईल, असं ते म्हणाले. भविष्यात अशा घटनांमधून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जागृती करणं आवश्यक असून, त्यासाठी महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

 राज्यातल्या खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्क वाढी विरोधात, शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार करता येईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत सांगितलं. शैक्षणिक संस्था शुल्क विनियम अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर समितीनं आपल्या अहवालात सुचवलेली ही शिफारश शासनानं, मान्य केली असल्याचं, तावडे म्हणाले. शैक्षणिक शुल्काबाबत तक्रार करणाऱ्या पालकांची संख्या २५ टक्क्यांच्या वर असल्यास शुल्क नियंत्रण समितीनं याची दखल घेऊन सुनावणी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचं तावडे यांनी सांगितलं.

 शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सक्ती झाल्यासही, शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार नोंदवता येणार आहे. या समितीने दिलेल्या निर्णयात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.

****

 पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्या परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत टाकून, परीक्षा प्रक्रियेतून कायमस्वरुपी बाद करणार असल्याचं, तावडे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हे अधिवेशन संपण्यापूर्वी तज्ज्ञांची बैठक घेऊन, ठोस उपाययोजना केली जाईल, असं तावडे यांनी सांगितलं.

****

 रेल्वे भरती गोंधळाविरोधात शिकाऊ उमेदवारांनी काल सकाळी मुंबईत केलेल्या रेल रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यावरुन विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आंदोलनकर्त्यांनी उपनगरी रेल्वेगाड्यांवर दगडफेक केल्यामुळे पोलिसांकडून लाठीमार केल्याचं सांगितलं. शिकाऊ उमेदवारांना नोकरीत २० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत, यावर लवकरच तोडगा निघेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 रेल्वे विभागाच्या भरती प्रक्रियेत कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारे दिलेल्या निर्देशांचं पालन केलं जात असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. शिकाऊ उमेदवारांनी काल केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी एक पत्रक जारी केलं. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनी येत्या ३१ मार्चपर्यंत नोकरीसाठी अर्ज करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

 अहमदनगर शहरातल्या माळीवाडा भागामधल्या कुरीअरच्या एका दुकानात काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमाराला एका पार्सलचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

****

 औरंगाबाद शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्रपणे पर्यटन  आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी ४४० कोटी रुपयंची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सागितलं.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 ग्राहकांकडची  वीज देयकाची जवळपास ३९ हजार कोटी रूपयांची थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणनं  राज्यभरात वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या जवळपास एक कोटी ४१ लाख ग्राहकांकडे ही वीज देयकांची थकबाकी आहे.  या मोहिमेअंतर्गत एक हजार रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचं महावितरणनं म्हटलं आहे. यापूर्वी थकबाकी वसुलीसाठी राबवलेल्या विविध योजनांचा फारसा परिणाम झाला नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं महावितरणनं म्हटलं आहे.

 दरम्यान, थकबाकीची वसुली करतांना कामचुकारपणा केल्याच्या कारणावरून  महावितरणच्या औरंगाबाद इथल्या छावणी  उपविभागाचे अभियंता दीपक माने यांच्यासह  ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

****

  औरंगाबाद इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये  ‘प्रशासन आणि लोकशाही : भारताचा अनुभव’ या विषयावर निवृत्त सनदी अधिकारी माधवराव गोडबोले यांचं काल विशेष व्याख्यान झालं. ‘सुशासन’ हा नागरिकांचा मुलभूत अधिकार म्हणून मान्य झाला पाहिजे असं मत गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले…



 माझी अशी मागणी आहे, गेल्या 12 ते 14 वर्षापासून की ‘सुशासन’ चांगल शासन गुड गव्हर्णस नागरीकाचा मुलभुत अधिकार म्हणून मान्य झाला पाहिजे. आता काहि वर्ष झाली माहितीचा अधिकार कायदा  पारित होउुन. खाजगी क्षेत्रालाही याच्या मध्ये आणलं पाहिजे. उदारणार्थ शैक्षणिक संस्था आहेत ज्या कमरशियल म्हणून चालवल्या जातात. त्यांनाही याच्या मध्ये आणलं पाहिजे. फाईल वरचं सर्व नोटींग कश्या तरेने झालं आहे हे कळण्याचा अधिकार लोकांना असला पाहिजे.

*****

 लातूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीनं काल स्वच्छ लातूर आणि स्वच्छ हवा या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ९० सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला. नागरिकांनी स्वेच्छेनं काम केल्यास लातूर स्वच्छ आणि सुंदर होईल असं पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी बोलतांना सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या पाचलेगाव इथं श्री स्वामी संचारेश्वर संस्थानच्या वतीनं येत्या २८ मार्च पर्यंत सहस्त्रचंडी महायागाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त काल याठिकाणी कलश मिरवणूक काढण्यात आली, पुढच्या बुधवारपर्यंत दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

  महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार देण्याची संवेदनशीलता प्रत्येक घटकानं जोपासली तर त्यातून निश्चितच सकारात्मक समाज घडेल, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी  म्हटल आहे. औरंगाबाद इथं काल राज्य महिला आयोग आणि महिला किसान अधिकार मंचच्यावतीनं आयोजित महिलांचा संपत्तीवरील हक्कांबाबत जाणीव जागृती तलाठी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमधे महिलांच्या सुरक्षित, सन्मानित अस्तित्वाला विशेष महत्त्व आहे असं सांगून महिलांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज  असल्याच त्या पुढं म्हणाल्या.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आयोजित कृषी महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून या महोत्सवाला स्थानिकांचा विशेषत: महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

*****

***

No comments:

Post a Comment