Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च
२०१८
दुपारी १.०० वा.
****
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे
अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणातल्या चौथ्या खटल्यात चौदा वर्ष
तुरुंगवास आणि ६० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांचीच्या विशेष सीबीआय
न्यायालयानं आज त्यांना भारतीय दंड विधानाखाली सात वर्ष, आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक
कायद्याखाली सात वर्ष, अशा दोन कलमांखाली ही शिक्षा सुनावली. डिसेंबर १९९५ ते जानेवारी
१९९६ या काळात दुमका कोषागारातून अवैधरित्या तीन कोटी रुपये काढल्याप्रकरणी त्यांना
ही शिक्षा सुनावण्यात आली. लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणातल्या पहिल्या खटल्यात
तीन वर्ष, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या खटल्यात प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा याआधीच सुनावण्यात
आली आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून,
लोकायुक्त नियुक्त न करण्याबाबत तपशीलवार उत्तर मागितलं आहे. तसंच लोकायुक्त नियुक्तीबाबतची
निश्चित अशी वेळ सांगण्याबाबतही न्यायालयानं या राज्यांना बजावलं आहे. या राज्यांमध्ये
जम्मू काश्मीर, मणीपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, तामिळनाडू, तेलंगणा,
त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. लोकपाल आणि लोकायुक्त
कायद्याच्या कलम ६३ प्रमाणे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकपाल नियुक्त
करणं बंधनकारक आहे.
****
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता
पक्षानं संख्याबळात वाढ करत राज्यसभेतही सर्वात मोठ्या पक्षाचं स्थान मिळवलं आहे. ५९
जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत दहा राज्यांमधून ३३ उमेदवार बिनविरोध निवडुन आले,
यामध्ये भाजपचे १६ उमेदवार विजयी झाले. तर काल उर्वरित २६ जागांसाठी झालेल्या मतदानात
भाजपचे आणखी १२ उमेदवार विजयी झाले.
****
दिल्ली उच्च न्यायालयानं लाभाचे पदप्रकरणी आम आदमी
पक्षाच्या २० आमदारांना अपात्र घोषित करणारा केंद्र सरकारचा अध्यादेश रद्द ठरवला आहे.
तसंच या आमदारांची याचिका पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवत त्यावर फेरविचार करण्याचा
आदेश दिला आहे. या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत निवडणूक आयोगानं केलेली शिफारस ही
पूर्वग्रहदुषित असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
देशातल्या मक्याच्या पिकाखालाचं
क्षेत्र तसंच पिकाची उत्पादकता वाढल्यामुळे गेल्या काही वर्षात मक्याच्या उत्पादनात
भरघोस वाढ झाली असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्ली इथं फिक्कीच्या वतीनं आयोजित पाचव्या भारत मका शिखर परिषदेत ते बोलत होते. सन
२०१७-१८ या वर्षात मक्याचं २७ दशलक्ष टन होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या मक्याच्या निर्यातीत भारताचा जगात पहिल्या पाच देशात समावेश असल्याचं ते म्हणाले.
****
विविध
तपास यंत्रणाशी चर्चा करून फेसबुकवरील माहितीचा गैरवापर रोखण्याबद्दल एक कार्यप्रणाली
तयार केली जाईल, असं भारताच्या निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. सोशल मिडीयावरील वापरकर्त्यांची
माहिती उघड होणं आणि त्याचा गैरवापर होणं, यासंबंधीच्या
जोखमीबद्दल निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि तपास यंत्रणा एकत्रितपणे विचार करतील, असं
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांनी सांगितलं.
****
देशातलं
ई-कचरा व्यवस्थापन पर्यावरण पूरक होण्यासाठी तसंच त्याच्या परिणामकारक
अंमलबजावणीसाठी नियमांमध्ये सरकारनं सुधारण केली आहे, अशी
माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन
यांनी दिली आहे. ई-कचऱ्यावर प्रक्रिया करायला सोपं जावं यासाठी या नियमांमधे
सुधारणा करण्याबरोबरच, ई - कचरा निर्माण करणाऱ्यावरच त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी
निश्चित केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आज
संध्याकाळी साडे आठ ते साडे नऊ या वेळात जगभरात ‘अर्थ आवर’ पाळला
जाईल. ‘वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया’-डब्ल्यू
डब्ल्यू एफ यांनी जागतिक स्तरावर याची सुरुवात केली असून, यामधे
जगभरातले १७८ देश सहभागी
होतात. यामधे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगभरात
एक तास अनावश्यक वीजेची उपकरणं बंद ठेवली जातात. केंद्रीय
पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी आज जनतेला एक तास
अनावश्यक विजेची उपकरणं बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं सुरु असलेल्या आय एस
एस एफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरनं दहा मीटर पिस्टल प्रकारात
सुवर्ण पदक पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात मनूनं थायलंडच्या कन्याकॉर्न हिरणफोमचा
पराभव केला.
****
म्यानमारच्या
येगॉन इथं सुरु असलेल्या सतराव्या आशियाई बिलियर्ड्स स्पर्धेत भारताचा बिलियर्ड्सपटू
पंकज अडवाणी अंतिम फेरीत पोहोचला आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात
अडवाणीनं ध्वज हिरयावर पाच
- एक असा विजय मिळवला.
*****
***
No comments:
Post a Comment