▼

Friday, 2 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.03.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मार्च २०१८ दुपारी १.०० वा.

****

पंजाब नॅशनल बँकेत साडे अकरा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या युनायटेड स्टेट्स - अमेरिकेत असल्याचं, प्रसारमाध्यमांकडून समजलं आहे, मात्र या वृत्ताला दुजोरा देण्यास, अद्याप असमर्थ असल्याचं, अमेरिका सरकारनं म्हटलं आहे. नीरव मोदी याचा ठावठिकाणा शोधण्यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना, अमेरिकेच्या एका प्रवक्त्यानं ही माहिती दिली. हे प्रकरण अमेरिकेच्या न्यायविभागाकडे वर्ग करण्यात आल्याचं, या प्रवक्त्यानं सांगितलं मात्र, न्याय विभागानं नीरव मोदीसंदर्भात काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या एका न्यायालयानं, नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड या कंपनीकडून कर्ज वसूल करण्यास प्रतिबंध घातले आहेत. नीरव मोदीनं दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी न्यायालयात अर्ज केल्यानं, हे निर्देश देण्यात आले आहेत.

****

रेल्वे तिकिटांच्या नोंदणीसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार डेबिट कार्डद्वारे करणाऱ्या प्रवाशांना व्यापार सवलत दर शुल्क - एम डी आर आकारलं जाणार नाही, असं रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलं आहे. याबाबतच्या सूचना वित्त सेवा विभागानं बँकांना दिल्या आहेत. रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

छत्तीसगडमध्ये विजापूर इथं आज सकाळी तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारल्या गेलेल्या दहा नक्षलवाद्यांमध्ये नक्षली चळवळीच्या म्होरक्यांचा समावेश असल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांकडून वर्तवण्यात आली आहे. आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी मारले गेले. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. सध्या या नक्षलवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले जात असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचं, पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

****

शेतीवरची संकटं दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावं लागेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. सातारा जिल्ह्यात देगाव-सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये सातारा महा अन्न प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारची फूड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून, या महा अन्न प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्राच्या अन्न प्रक्रिया धोरणाला सुसंगत असंच धोरण राज्यानं तयार केलं असून, त्याचा फायदा राज्यातल्या शेतकऱ्यांना होत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

पहिलं विभागीय बालकुमार साहित्य संमेलन येत्या अकरा तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणार आहे. पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची उदगीर शाखा आणि उदगीरच्या ‘शिवार साहित्य प्रबोधन मंच’ यांच्यातर्फे संयुक्तपणे हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बालसाहित्यिक स्वाती राजे यांची निवड झाली आहे. यामध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद, कविसंमेलन यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीनं महिला दिनी महिला मतदारांच्या मतदार नाव नोंदणीसाठी जिल्हा तसंच तालुकास्तरीय जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांनी ही माहिती दिली. नव्यानं मतदार नोंदणी झालेल्या महिला मतदारांचा प्रातिनिधीक सत्कार, मतदार नोंदणी बाबतच्या प्रक्रियेचं मार्गदर्शन, विवाहित महिलांच्या नावातील बदल, नवीन नावनोंदणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमद्वारे मतदान, या संपूर्ण प्रक्रियेबाबत महिला मतदारांची जनजागृती करणाऱ्या उपक्रमांचं आयोजन, महिला दिनी करण्यात येणार आहे. महिला मतदारांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन निवडणूक विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

****

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. त्रिपुरा इथं गेल्या महिन्याच्या अठरा तारखेला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये गेल्या मंगळवारी मतदान झालं. तिन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी साठ जागा आहेत, मात्र त्रिपुरा आणि मेघालयमध्ये प्रत्येकी एका जागेवर उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं तसंच नागालँडमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं, या तिनही राज्यात फक्त ५९ जागांसाठीच मतदान झालं आहे.

****

किरगिस्तान इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजनी गटात भारताच्या विनेश फोगाटनं रौप्य पदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात विनेशला चीनच्या चुंग लेई कडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या संगीतानं ५९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं चार पदकं जिंकली.

****

No comments:

Post a Comment