▼

Tuesday, 10 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

**** 
जम्मू काश्मीरमधल्या केरी सेक्टर परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैन्यानं काल रात्रीच्या सुमारास लष्करी चौक्यांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. 

****
 जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा होत आहे. होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉक्टर ख्रिधीयन फ्रीडरिक सॅम्युअल हॅनमन यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येतो. यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका विज्ञान संमेलनाचं उद्घाटन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात गेल्या ४० वर्षातल्या विज्ञानाच्या योगदानाचा परामर्ष घेतला जाणार आहे. यावेळी होमीयोपॅथी संदर्भातल्या कार्यासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, तसंच युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

 बंगळुरू इथल्या मानसिक आजाराच्या राष्ट्रीय संस्थेचं सॅटेलाईट केंद्र महाराष्ट्रातल्या चार पैकी एका मानसिक रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून, यासाठी या राष्ट्रीय संस्थेनं सल्लागार म्हणून काम करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. या संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मानसिक स्वास्थ्यासंबंधी वाढत असलेले आजार आणि जागृती विचारात घेता राज्यातही असं केंद्र सुरु व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.

****
           सातारा जिल्ह्यात खंडाळा घाटातला बोगदा ओलांडून शिरवळकड़े मजूर घेवून निघालेल्या टेम्पोला आज सकाळी साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. यात १७ जण ठार, तर १५ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यठिकाणी मदत कार्य सुरु करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 सेझ साठी राखीव असलेल्या पण वापरात नसलेल्या जमिनींचा वापर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एकात्मिक उद्योग विकास प्रकल्प योजना आखत असून, त्यामुळे राज्यात १० हजार हेक्टर जमीन औद्योगिक विकासासाठी उपलब्ध होईल अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर  इथं सिन्नर तालुका औद्योगिक संस्थेच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकार एकात्मिक औद्योगिक विकासासाठी नियमावली तयार करत असून, त्यानुसार झोन बदलण्याची कार्यवाही लवकर केली जाईल, असं ते म्हणाले.

*****

***

No comments:

Post a Comment