▼

Wednesday, 11 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी देशभरातल्या शंभरहून जास्त मुद्रा लाभार्थींशी संवाद साधणार आहेत. कोणत्याही हमीशिवाय सुलभ कर्जं उपलब्ध करून देऊन युवकांमधल्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं २०१५ मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन लाख वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जं वितरीत करण्यात आली आहेत.

****



 विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात काहीही काम होऊ शकलं नाही, असं प्रतिपादन करत, विरोधी पक्षांच्या या नकारात्मक राजकारणाचा निषेध दर्शवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार उद्या उपोषण करणार आहेत. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या निषेधाचं नेतृत्व करत उद्या उपोषण करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विरोधकां मुळे हे सत्र पूर्ण वाया गेलं असून, कामकाजाचं प्रमाण चार ते आठ टक्क्यांपर्यंत घसरलं, सगळी महत्त्वाची विधेयकं प्रलंबित राहिली आणि जनतेच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांचं नुकसान झालं, आणि यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असं भारतीय जनता पक्षाने  म्हटलं  आहे.

****



 चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहील, तसंच उत्पादन क्षमता वाढल्यामुळे आणि बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणां नंतर गुंतवणूक वाढल्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात हा दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील, असा अंदाज आशियायी विकास बँकेनं वर्तवला आहे. मागच्या आर्थिक वर्षात हा दर सहा पूर्णांक सहा टक्के, इतका होता.

****



 सर्वोच्च न्यायालयातले खटले विविध घटनापीठांकडे सोपवण्यासाठी एक प्रणाली निश्चित करावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. कामकाजाचं वाटप करणे, ही मुख्य न्यायाधीशांची संवैधानिक जबाबदारी असल्याचं सांगत न्यायालयानं ही याचिका रद्द केली.

****



 जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या खुदवानी  भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलां दरम्यान काल रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत सैन्याचा एक जवान शहीद झाल्याचं तसंच एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सैन्यदलाचे दोन आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे. लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचे दोन ते तीन अतिरेकी सुरक्षा दलाच्या घेण्यात अडकले असून, तिथे अजूनही चकमक सुरू आहे.

****



 राज्यातल्या ग्रामीण ३४ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्हे उघड्यावर शौचमुक्त झाले असून, येत्या आठवड्याभरात उरलेले दोन जिल्हेही हे ध्येय गाठतील आणि राज्य उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याची घोषणा केली जाईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. उघड्यावर शौचापासून मुक्त झालेल्या नाशिक, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, नंदुरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शौचालयं बांधण्याच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****



 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगपुऱ्यातल्या महात्मा फुले यांच्या  पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. औरंगाबाद सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीनं महात्मा फुले समाजभूषण पुरस्कारांची सुरूवात या वर्षीपासून करण्यात आली असून, ज्येष्ठ समाजसेवक सुदाम चिंचाणे, राधाकिसन शेवाळे, ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर  आणि श्रीकांत सराफ, प्राध्यापक प्रभाकर गायकवाड आणि विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राध्यापक भारत खैरनार यांना या पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं.

****



 राज्यात वन विभागानं लोकसहभागातून महा वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातल्या नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य  वनेतर क्षेत्रामधल्या वृक्ष आच्छादनामध्ये देशामध्ये अग्रगण्य राज्य ठरलं असल्याची माहिती  वनमंत्र्यांनी दिली  आहे. येत्या जुलै महिन्यात तेरा कोटी वृक्ष लावण्यात येणार असल्याचंही वनमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

****

 एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला अजुन एक पदक प्राप्त झालं आहे. नेमबाजीच्या डबलट्रॅप प्रकारात भारताच्या अंकुर मित्तल यानं कांस्य पदक जिंकलं आहे.

*****

***

No comments:

Post a Comment