▼

Thursday, 12 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



 भारत एक उदयोन्मुख संरक्षण सामग्री उत्पादक देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चेन्नई इथं आज दहाव्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशाची सशस्त्र सेना सुसज्ज करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सरकार तयार असून, यासाठी एक स्वतंत्र संरक्षण उद्योग समूह स्थापन करणार असल्याचं ते म्हणाले. गेल्या चार वर्षात सरकारनं एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स किंमतीच्या ७९४ निर्यात परवानग्या जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘संरक्षण सामग्री उत्पादनामधला उदयोन्मुख भारत’ हे या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य आहे. जगभरातल्या ५०० हून अधिक कंपन्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

****

 ऑस्ट्रेलियातल्या गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज नेमबाजीत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात, तर कुस्तीमध्ये बबीता कुमारीनं ५३ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. 

 या स्पर्धेत कुस्तीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात झाली. ५७ किलो वजनी गटात राहुल आवारे आणि ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारनं अंतिम फेरी गाठून रौप्य पदक निश्चित केलं आहे. थाळीफेक प्रकारात सीमा पुनिमा आणि नवजीत धिल्लन आज अंतिम फेरीत खेळतील. महिला हॉकी गटात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य सामना खेळला जाणार आहे. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि के. श्रीकांत उप-उपांत्यपूर्व सामने खेळतील. १२ सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

****

 दरम्यान, या स्पर्धेतल्या राज्यातल्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. यात सुवर्ण पदक विजेत्यांना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना २० लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांनाही १२ लाख ५० हजार रुपयांचं बक्षिस राज्य सरकारनं जाहीर केलं आहे.

****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज आय आर एन एस एस - वन एल या नौवहन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून पी एस एल व्ही - सी ४१ प्रक्षेपकातून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहामुळे देशातली जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रात दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसंच या उपग्रहाचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

****

 विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात काहीही कामकाज होऊ शकलं नाही. विरोधी पक्षांच्या या नकारात्मक राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज देशभरात उपोषण करण्यात येत आहे. पक्षाचे खासदार आपापल्या मतदारसंघात उपोषण करत आहेत.

 औरंगाबाद इथं भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात केली. आमदार अतुल सावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित आहेत.

****

 राज्यात काही नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं १२ पेकी १० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. तर दोन जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या.

 कणकवली नगर पंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीनं १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. स्वाभिमान पक्षाला १०, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवता आला. स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले.

 रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये दोन हजार ४३५ मतं मिळवून विजयी झाल्या. तर गुहागरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल विजयी झाले.

****

 राज्यात येत्या एक मे पासून ३०० तालुक्यांत ऑनलाइन सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रांक, भूमी अभिलेख अशा विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. एक मे पासून ज्या तालुक्यात ऑनलाईन सातबारा उतारा दिला जाणार नाही, त्या ठिकाणी ३१ मे पर्यंत ही सेवा दिली जाईल, असंही ते म्हणाले.

*****

***

No comments:

Post a Comment