▼

Sunday, 15 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 ऑस्ट्रेलिया गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेचा आज समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २०  कांस्यपदकांसह तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात के श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सायना नेहवालनं, पी व्ही सिंधूचा २१-१८, २३-२१ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं, पी.व्ही.सिंधूला रौप्य पदक मिळालं.

****

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतील. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू त्यांच्या कार्यालयात जेटली यांना शपथ देतील. उत्तरप्रदेशातून जेटली राज्यसभेवर निवडून गेले आहेत. आजारपणामुळे ते अधिवेशन काळात शपथ घेऊ शकले नव्हते.

****

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत येत्या एक मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं काल यासंदर्भात एक पत्रक जारी करून, ही मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं.

****

 राज्यात शेत जमिनींवर वृक्ष लागवड करता येणार असून, याबाबतचा  शासन निर्णय नुकताच जाहीर झाल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्यानं वृक्ष लागवड होईल. संबंधीत लाभधारकांची निवड आणि पात्रता, याबाबतच्या शासन निर्णयात निश्चित केलेली आहे. बागायत कृषी क्षेत्रात किमान ९० टक्के आणि कोरडवाहू क्षेत्रात किमान ७५ टक्के झाडांचं संवर्धन करणारे शेतकरीच, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाला पात्र असतील.

****

 महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं पन्नास वर्षाहून अधिक वयाचे वृद्ध साहित्यिक तसंच कलाकारांना सन्मान वेतन दिलं जातं. लातूर जिल्ह्यातल्या अशा कलाकारांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेनं एक हजार तीनशे पन्नास साहित्यिक तसंच कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. प्रतिवर्षी ६० याप्रमाणे गेल्या दोन वर्षासाठी १२० साहित्यिक आणि कलाकारांची निवड करून, त्यांना सन्मान वेतन दिलं जाणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment