▼

Tuesday, 17 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७   एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

*****



Ø देशात यावर्षी ९७ टक्के पावसाचा हवामान खात्याचा पहिला अंदाज

Ø एक लाख कोटी रूपये खर्च करून दिल्ली आणि मुंबई दरम्यान नवीन जलदगती महामार्ग बांधण्याचा केंद्र सरकारचा विचार

Ø मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राज्यात ३० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं जाळं डिसेंबर २०१९ पर्यंत उभारण्याचं उद्दिष्ट

आणि

Ø भारतीय प्रशासकीय सेवेतल्या २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या; सुनील चव्हाण औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी, तर पवनीत कौर जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  एस एल माळी नांदेडचे महापालिका आयुक्त

*****



 देशात यावर्षी सुमारे ९७ टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. यावर्षी मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता फारच थोडी असून, येत्या १५ मे रोजी नैऋृत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

****



 दिल्ली आणि मुंबई दरम्यान एक लाख कोटी रूपये खर्च करून नवीन जलदगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सांगितलं. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी चंबळ महामार्ग योजनेचीही घोषणा केली.

****



 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं जाळं उभारण्याचं  उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून  डिसेंबर २०१९ पूर्वी हे उद्दिष्ट पूर्ण करावं तसंच हायब्रिड अॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीनं कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामं सुरु करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हायब्रिड अॅन्युईटी रस्त्यांच्या कामांच्या आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत मंत्रालयात काल ते बोलत होते.

 या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ४५२ किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तर ६ हजार ७५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काम पुढच्या महिन्यात सुरु होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****



 तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाईन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणं यासह तलाठी संघटनेच्या अन्य मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिले. राज्य तलाठी संघटनेच्या प्रतिनिधींशी मुंबईत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निर्देश दिले. सात बारामधल्या अंकेक्षित सहीच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचं तलाठी संघटनेनं या चर्चेनंतर जाहीर केलं.

****



 ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्सच्या वतीनं दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

 मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना यावर्षी मास्टर दीनानाथ जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.       सर्वोत्कृष्ट नाटकाचा मोहन वाघ पुरस्कार 'अनन्या' या नाटकाला जाहीर झाला आहे.

****

 शेगाव - खामगाव - जालना या रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीनं गेल्या १२ दिवसांपासून पुकारलेलं सत्याग्रह आंदोलन पुढच्या ४५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे.   

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वेमार्गाबाबत ठराव मंजूर करून, मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांची बैठक घेण्याचं, तसंच समितीच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्याबाबत ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

****

 नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या सिंदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सारखाणी गावच्या  बाजारपेठेत काल बोगस बियाण्यांची चार हजार २२४ पाकीटं जप्त करण्यात आली. बाजारपेठेत बोगस बियाणं विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली. बाजारभावानुसार ३२ लाख १० हजार, २४० रुपये किमतीची ही बियाणं आहेत.

****



 परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, बोंडअळीमुळे कापसाच्या पिकाची झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, मूग, उडीद, तूर,तीळ या पिकांना शंभर टक्के विमा मिळावा या मागण्यांसह अन्य मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 भारतीय प्रशासकीय सेवेतल्या २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली असून, ठाण्याचे अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून, नांदेडच्या मनपा आयुक्तपदी एस एल माळी यांची बदली झाली आहे. अहमदनगरचे मनपा आयुक्त जी सी मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली असून, औरंगाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांची अहमदनगर मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

 आर्दड यांच्या जागी पालघरच्या सहायक जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

****



 बीड तालुक्यात, पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांना बक्षीस देऊन गौरवणार असल्याचं, आमदार विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. ते काल बीड पंचायत समितीच्या वतीनं आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यावेळी उपस्थित होते, या योजनेच्या अंमलबजावणीत कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा भापकर यांनी दिला. या कार्यशाळेत माथा ते पायथा जलसंधारणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.

****



 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतल्या विजेत्या गावांना पुरस्काराइतकीच रक्कम खासदार फंडातून देणार असल्याची घोषणा खासदार राजीव सातव यांनी केली आहे. काल कळमनुरी तालुक्यात मौजे कवडा आणि भुरक्याची वाडी इथं, श्रमदान केल्यानंतर ते बोलत होते. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कळमनुरी तालुक्यातली ११० गावं सहभागी झाली आहेत.

****

 नांदेड इथं ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजने अंतर्गत मानार प्रकल्पातला गाळ काढण्याच्या कामाचं उदघाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते काल झालं. अंबाजोगाईच्या मानवलोक स्वयंसेवी संघटनेनं गाळ काढण्याच्या कामासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गाळ घेऊन जाण्याचं आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी केलं.

****

 परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला राष्ट्रीय महामार्ग‍ाशी जोडणाऱ्या विविध रस्त्याच्या कामांचं उद्धाटन आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग‍२२२ ते वांगी, नांदखेडा-सनपूरी-नांदापूर, राष्ट्रीय महामार्ग २४८ ते झरी मिर्झापूर, मांगणगाव-साडेगाव या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

****

 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या दरेगाव शिवारात वादळी वाऱ्यात अंगावर वीज पडून एक २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

 हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पिपळदरी परिसरात काल रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज झाला, यामुळे नागरिक घराबाहेर आले. भूकंपासारख्या या सौम्य धक्क्यामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तीय हानी झाली  नाही.  

*****

***

No comments:

Post a Comment