▼

Tuesday, 17 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७  एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



 लोकपाल नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या निवड समितीमध्ये एका नामवंत कायदे तज्ज्ञांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. याप्रकरणी पुढची सुनावणी १५ मे रोजी होणार आहे. लोकपालची नियुक्ती लवकर व्हावी अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली आहे.

****

 बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर जीएसटी संदर्भात स्थापन मंत्रिसमूहाची बैठक होत आहे. यामध्ये जीएसटी विवरणपत्र अधिक सोपं बनवण्याबाबत चर्चा होणार आहे. व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या मंत्रिसमूहाची स्थापना करण्यात आली आहे.

****

 जागतिक बँकेनं यावर्षी भारताच्या आर्थिक वृध्दीचा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के तर पुढच्या दोन वर्षात सात पूर्णांक पाच दशांश टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराच्या परिणामातून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर आली असल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. दक्षिण आशिया संबंधित द्विवार्षिय आर्थिक अहवाल बँकेनं वॉशिंग्टन इथं सादर केला. २०१७ मधल्या सहा पूर्णांक सात दशांशवरुन भारताचा आर्थिक वृध्दीचा दर २०१८ मध्ये सात पूर्णांक तीन दशांशवर जाण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्टॉकहोम इथं स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लोवेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान काल स्टॉकहोम इथं पोहोचले. भारत आणि स्वीडन याच्यातल्या संयुक्त कृती कार्यक्रमाची घोषणा होणार असून, संयुक्त नावीन्य भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

****

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ते तयार करण्याची निर्धारित कालमर्यादा सन २०२२ वरून सन २०१९ निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी हे उद्दीष्ट २०२२ मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता, हे उद्दीष्ट पूर्वनिर्धारित वेळेच्या दोन वर्ष आधी पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या एक लाख ६६ हजार वस्त्यांऐवजी एक लाख ७८ हजार पात्र वस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

****

 देशानं कुठल्याही ‘मतवादात’ सिमित रहाणं धोक्याचं आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक धोरण दूरगामी दृष्टीकोन’ या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. हेतूशी प्रामाणिक राहून आकडेवारीत न अडकता धोरणं राबवली तर यश निश्चित आहे मात्र साम्यवाद, भांडवलशाही अशी कुठल्याही विचारसरणीत गुलाम होऊ नका असंही ते म्हणाले. पूर्णतः रोकड विरहीत कल्पना ही व्यवहार्य नसून, प्रत्येकासाठी ते शक्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

 भारतीय रेल्वे खानपान सेवा आणि पर्यटन मंडळाची दोन हॉटेल्स खाजगी कंपन्यांना परिचालनासाठी देताना झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि पूत्र तेजस्वी यादव यांच्यासह १२ जणांविरुध्द तसंच दोन खाजगी कंपन्यांविरुध्द आरोपपत्र दाखल केलं आहे. नवी दिल्ली इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सीबीआयनं याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता तसंच पाटणा, रांची, आणि भुवनेश्वर इथं छापे घातले होते.

****

 राज्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ९८ पूर्णांक ५० टक्के अंगणवाड्यांची तर त्यातल्या ९० पूर्णांक ४७ टक्के बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली. या कामाच्या अंमलबजावणीसाठी ९९३ पथकं कार्यरत आहेत, त्यात एक पुरुष आणि एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका आणि औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

****

 प्लास्टिकचं उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचवलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवर एका समितीची स्थापना केली आहे. मंत्रालयात प्लास्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लास्टिकचा वापर आणि नष्टीकरण करण्याबाबत चर्चा झाली, यावेळी ही घोषणा करण्यात आली. ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मुद्यांचा अभ्यास करुन प्लास्टिक बंदीबाबत शासनानं नियुक्त केलेल्या शक्ती प्रदक्त समितीला आपला अहवाल सादर करणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment