आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
बुद्ध पौर्णिमा आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरी
होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. गौतम बुद्धांनी दिलेला शांती, अहिंसा
आणि प्रेमाचा संदेश लोकांना इतरांसाठी
काम करण्याला प्रवृत्त करेल असं राष्ट्रपती
आपल्या संदेशात म्हणाले. भगवान
बुद्ध हे करुणा, सेवा आणि त्यागाचं प्रतीक होते असं सांगून पंतप्रधानांनी, देशातली
महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळं दक्षिण पूर्व आशियाला जोडण्यासाठी भारत बुद्धिस्ट पर्यटनाची
रुपरेखा विकसित करत असल्याचं सांगितलं.
औरंगाबाद शहरातल्या बुध्द लेणीवर पहाटे महापरित्राण
पठण करण्यात आलं. सायंकाळी पाच वाजता क्रांतीचौकातून भिक्खू संघाच्या नेतृत्वात मिरवणूक
काढण्यात येणार असल्याची माहिती प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष भदंत
विशुध्दानंद बोधी महाथेरो यांनी दिली आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागानं नांदेड रेल्वे स्थानकावर
काल प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी केली. या मोहीमेत २७८ विनातिकीट प्रवाशांवर
कारवाई करुन त्यांच्याकडून ५८ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. शिवाय रेल्वेमधली
स्वच्छता, खाद्य तसंच पेयपदार्थ आणि त्यांच्या
किमती, पाण्याची उपलब्धता, दिवे तसंच पंख्यांची स्थिती, आदी तपासण्याही रेल्वे विभागानं
काल केल्या.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी १५ पथकं स्थापन करण्यात
आली असून, यामध्ये १५ अधिकारी आणि ७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच जामखेड साठी अतिरिक्त
१० अधिकारी आणि २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार
शर्मा यांनी दिली.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात अकोला इथं
विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही
घडना घडली. मरण पावलेली ही मुलं चुलत भावंडं होती.
*****
***
No comments:
Post a Comment