▼

Wednesday, 11 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 11.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारताच्या सीमारेषेवरची काही असुरक्षित ठिकाणं सील करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतला पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. भारत बांगलादेश सीमेवर आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीनजिकच्या धुबरी इथला पंचावन्न किलोमीटरचा पट्टा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरक्षित करण्यात आला असून, अशाच प्रकारचा पुढचा प्रकल्प भारत पाकिस्तान सीमेवर जम्मूमध्ये या महिन्यात कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के.के.शर्मा यांनी पीटीआयला आज दिली.

****

भारताच्या आय आर एन एस एस एक एल या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची बत्तीस तासांची उलटगणती काल रात्री आठ वाजून चार मिनिटांनी सुरू झाली असून, उद्या पहाटे चार वाजून चार मिनिटांनी त्याचं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे. भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणालीतला हा नववा उपग्रह असून, हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर विशेषत: सागरी भागातल्या दिशादर्शनासाठी मोठी मदत मिळणार आहे.

****

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधान भवनात फुले यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. जालना इथे नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याल पुष्पहार अर्पण करुन, तर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद इथे यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. महात्मा फुले आणि सावित्रीबई फुले यांच्या एकत्र पुतळ्याच्या नागरिकांच्या मागणीबाबत येत्या आठ दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज एका कार्यक्रमात दिलं.

****

रत्नागिरी इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स कंपनी विकसित करण्यासाठी भारतीय सार्वजनिक तेल कंपन्यांची संघटना आणि सौदी अरेबियाची सौदी आर्माको ही कंपनी, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेत आज हा करार करण्यात आला. हा प्रस्तावित प्रकल्प जगातल्या सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांपैकी एक असून भारताची इंधनाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्याची क्षमता तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि आसपासच्या प्रदेशात मोठी आणि थेट तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही होईल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.

****

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेचं अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ लातूर इथल्या गांधी चौकात उद्या, गुरुवारी, सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत, खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्यावतीनं उपोषण करण्यात येणार आहे. यामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव आणि आमदार विनायक पाटील उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

चेन्नई इथे सुरू असलेल्या कावेरी नदी पाणी वाटपासंदर्भातल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, आयपीएल क्रिकेट स्पर्धांचे चेन्नई इथं होणार असलेले सामने दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे.

****

२००५ नंतर सेवेत आलेल्या सगळ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि २३ ऑक्टोबर २०१७ चा याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. याला शिक्षक सेनेनं पाठिंबा दिला.

****

लातूर महानगरपालिकेच्या गेल्या सहा वर्षांच्या व्यवहाराचं विशेष लेखापरिक्षण करावं आणि या कालावधीतल्या कामकाजाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश पाठक यांनी विधीमंडळाच्या अंदाज समितीकडे केली आहे. पाठक यांनी आज एका लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली.

****

अकोला इथे आज राज्यातलं सर्वाधिक म्हणजे एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदलं गेलं. मराठवाड्यात नांदेड इथं एकोणचाळीस पूर्णांक पाच, परभणी इथं एकोणचाळीस पूर्णांक चार, बीड इथं अडोतीस तर औरंगाबाद इथं सदोतीस पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment