Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
६५व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. चित्रपट सृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार
प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार सुयश
शिंदे यांच्या मयत या मराठी लघुपटाला, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शनाचा पुरस्कार पावसाचा
निबंध या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना, तर सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मृत्यूभोज
या चित्रपटाला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपटाचा पुरस्कार राजेंद्र
जंगले यांच्या चंदेरीनामा या चित्रपटाला तर यशराज कऱ्हाडे यांच्या म्होरक्या या चित्रपटाला
विशेष चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. न्यूटन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट,
टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार, तर बाहुबली
दोन या चित्रपटानं, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट साहसपट, आणि सर्वोत्कृष्ट
स्पेशल इफेक्ट्स, असे विविध पुरस्कार मिळवले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मॅाम
या हिंदी चित्रपटासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जाहीर झाला आहे. तर धप्पा या
चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे प्रमुख प्रसिद्ध
दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव सामुहिक अत्याचार प्रकरणातला आरोपी भाजप आमदार
कुलदीप सिंग सेंगर याला आज पहाटे केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं ताब्यात घेतलं
आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारनं उन्नाव जिल्ह्यात अल्पवयीन
मुलीवरील सामुहिक अत्याचार आणि तिच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूसंबंधित तीन
प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची राज्य सरकारची विनंती मान्य केली. कोणत्याही प्रकारचा गुन्हा आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणातल्या
आरोपीला माफ केलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना
फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारा नवीन कायदा करणार असल्याची घोषणा जम्मू काश्मीरच्या
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमधल्या हिरा नगर परिसरात
आठ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर त्या बोलत होत्या.
या पीडितेच्या कुटुंबाला सरकार पूर्ण न्याय देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या पार्श्वभूमीवर, उद्यापासून देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार
आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोहनेर आणि उमरगा तालुक्यातल्या मुरळी या गावांचा यात
समावेश आहे. पाच मे पर्यंत हे अभियान राबवलं जाणार असून, या कालावधीत सरकारच्या विविध
योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी
इथले रहिवासी असलेले एकतीस वर्षीय जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर आज फकीराबादवाडी
इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून
त्यांना मावंदना देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जम्मू
काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये बुधवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या
गोळीबारात त्यांना वीरमरण आलं.
****
ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतानं आणखी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक
पटकावलं. नेमबाजीत महिलांच्या ५० मीटर
रायफल-थ्री पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं, तर पुरुषांच्या गटात १५ वर्षीय अनिश भानवालानं २५ मीटर पीस्टल
प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.
याच स्पर्धेत अंजुम मौदगिलनं रौप्य पदक जिंकलं. अनिश भानवाला हा सुवर्ण पदक जिंकणारा देशातला सर्वात कमी वयाचा
खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत मुष्टीयुद्ध प्रकारात मनोज कुमार, विकास
कृष्णन, सतीश कुमार आणि मोहम्मद हसमुद्दिल आपापल्या गटाच्या अंतिम
फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आज सामने खेळतील. बजरंग, दिव्या
काकर, मौसम खत्री, पूजा धांदा या कुस्तीपटूंचेही आज सामने होणार आहेत. पुरुषांच्या
हॉकी गटात आज उपांत्य फेरीसाठी भारताची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. भारताच्या महिला हॉकी संघाला काल पराभव पत्करावा लागला, मात्र
कांस्य पदकासाठी त्यांचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये
पी व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत आज उपांत्यपूर्व फेरीतले
सामने खेळतील. या स्पर्धेत आतापर्यंत १६ सुवर्ण, आठ रौप्य आणि दहा कांस्य
पदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या
स्थानावर आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं
अभिनंदन केलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment