Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
उद्या स्वीडन आणि इंग्लंडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. व्यापार गुंतवणुकीसह
अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा उद्देश असलेल्या या दौऱ्यात ते लंडनमध्ये
थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार
आहेत. या दौऱ्यानंतर, पंतप्रधान २० एप्रिलला जर्मनीत चान्सलर ऍंजेला मार्केल यांची
भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमधे प्रांतीय तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा
होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या कठुआ
अत्याचार आणि हत्या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी.ए.मीर यांनी आरोपींच्या अटकेबाबत
केलेल्या वक्तव्याविषयी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन बाळगल्याबद्दल भाजपानं
विचारणा केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत हा प्रश्न विचारला. या प्रकरणातल्या खऱ्या आरोपींना
राजकीय हितासाठी पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप मीर यांनी केला आहे. या घटनेचा तीव्र
निषेध करत जम्मू काश्मीरमधल्या भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, काँग्रेसनं
मीर यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जावडेकर यांनी
केली आहे.
दरम्यान, भाजपच्या दोन्ही
मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वीकारले आहेत.
****
पंजाब नॅशनल बँकेत सुमारे
तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड झालेल्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या सर्व
संवैधानिक लेखा परीक्षकांना भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेनं शिस्तपालन मंडळासमोर
हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. २०११-१२ पासून २०१६-१७ पर्यंतच्या कार्यकाळात बँकेचे
व्यवहार तपासणाऱ्या आठ लेखा परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या घोटाळ्यात लेखा
परीक्षकांचा सहभाग आहे का, हे या चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
सरकारी कर्मचारी आपल्या
लहान मुलांच्या देखरेखीसाठी रजेवर असताना विदेशात जाऊ शकतात आणि या काळात रजा प्रवासी
भत्ता-एलटीसी देखील घेऊ शकतात, असं कार्मिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विविध सरकारी
विभागांकडून याबद्दल विचारणा केल्यानंतर मंत्रालयानं हा खुलासा केला. सध्या असलेल्या
नियमानुसार महिला कर्मचाऱ्यांना दोन लहान मुलांच्या देखरेखीसाठी जास्तीत जास्त ७३०
दिवसांची रजा मिळते.
****
सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत
येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं राज्यातले १४ किल्ले निवडून त्याचं
जतन संवर्धन करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण केला. याबाबत ‘गड संवर्धनाच्या
मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द करण्यात आलं आहे. या पुस्तकात रत्नागिरीतला शिरगाव
किल्ला, नाशिक जिल्ह्यातले खर्डा, गाळणा हे किल्ले, पुणे जिल्हयातले तोरणा आणि भूदरगड,
औरंगाबाद विभागातले अंतूर, परांडा आणि धारुर, नांदेड विभागातले औसा, कंधार आणि माहूर,
तर नागपूर विभागातल्या नगरधन, अंबागड आणि माणिकगड या सर्व किल्ल्यांचं जतन आणि दुरुस्ती
कशी करण्यात आली याबाबतची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात अकोले
इथल्या मॉडर्न हायस्कूल या शाळेजवळ असलेलं दारू दुकान हटवावं या मागणीसाठी संस्थेच्या
सर्व विभागातल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी यांनी आज रास्ता रोको आंदोलन
केलं. हे दुकान हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. शाळेचं कामकाज बुडू नये
म्हणून हे आंदोलन रविवारी करण्यात आलं.
****
समाधान शिबिराच्या माध्यमातून
परभणी जिल्ह्यातल्या एक लाख ३० हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला
असून, ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचं, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
यांनी म्हटलं आहे. सोनपेठ तालुक्यात आज समाधान शिबिराच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना
ते बोलत होते. समाधान शिबिरात सर्व विभागाच्या ग्रामपातळीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी
महत्त्वपूर्ण काम केलं असल्याचं ते म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा
परिसरात आज दुपारनंतर पाऊस झाला, जिल्ह्यात इतरत्रही जोरदार वारे वाहत असल्यानं, तापमानात
घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत विभागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
आहे.
****
ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट
इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांसह
एकूण ६६ पदकं मिळवत तिसरं स्थान पटकावलं. ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर इंग्लंड दुसऱ्या
स्थानावर आहे. आजच्या शेवटच्या दिवशी भारतानं एक सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य अशी
एकूण सात पदकं पटकावली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू,
ज्योस्ना चिनप्पा, दिपीका पल्लिकल या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या मुलींनी
देशाची मान उंचावली असं राष्ट्रपतींनी ट्विटरवर सांगितलं.
****
No comments:
Post a Comment