Saturday, 28 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.04.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांदरम्यान संवाद, दळणवळण वाढवण्याबरोबरच विश्वासाचं वातावरण निर्मितीसाठी आपापल्या सैन्याला सामरिक मार्गदर्शिका जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. वुहान शहरात झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण टिकवणं दोन्ही देशांसाठी हितावह असल्याबाबत यावेळी एकमत झालं. 

****

संरक्षण संपादन परिषद - डॅकनं तीन हजार ६८७ कोटी रुपयांच्या भांडवल संपादन प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या डॅकच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्थानिकीकरणाला अधिक वाव देणं आणि देशाच्या तंत्रज्ञान कौशल्याची नोंद घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या संपादनामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसीत केलेल्या ५२४ कोटी रुपयांच्या नॅग क्षेपणास्र यंत्रणेचा समावेश आहे.

****

प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं देशभरातल्या संरक्षित क्षेत्रांमध्ये प्लास्टीक बंदी केली असून, या भागांना प्लास्टीकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी याविषयी जनजागृती करावी, असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत. पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, या क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीकला बंदी करुन ते प्लास्टीकमुक्त क्षेत्र घोषित केलं असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या संदेशात सांगितलं.

****

स्वच्छ भारत ग्रामीण अभियानाअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला चांगल्या दर्जाचं वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये इतकी प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. या प्रोत्साहनपर रकमेत केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के इतका असतो. प्रसार माध्यमं याविषयी चुकीची आकडेवारी देत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं.

****

केंद्र सरकार दिव्यांगांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी अधिकाधिक दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय सामाजिक आणि न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. या योजनेअंतर्गत दारिद्र्य देषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशी उपकरणं दिली जातात.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या ऐतिहासिक अवशेषांची ओळख होण्यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे उद्या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता विद्यापीठ परिसरातल्या ऍथलेटिक्स मैदानापासून या वॉकला सुरूवात होईल. इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी हे तत्कालीन मराठा आणि मुघल राजकारणाबद्दल माहिती देतील. विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे करण्यात आलं आहे.

****

जालना शहरात उभारण्यात आलेल्या रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचा शुभारंभ येत्या चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जालना शहरात सिरसवाडी परिसरात २०० एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येत असून, यासाठी सरकारनं ३९३ कोटी रुपयांची तरतुद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षात या संस्थेत रसायन तंत्रज्ञान अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यास सुरुवात होणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.   

****

अहमदनगर इथल्या मकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर च्या वतीनं आज अखोरा ड्रिल मैदानावर नव्यानं सैन्यात सामील होणाऱ्या आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३९२ प्रशिक्षणार्थींच्या पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी या प्रशिक्षणार्थींना देशसेवा आणि कर्तव्य निष्ठतेची शपथ देण्यात आली.

****

चीन मधल्या वुहान इथं सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि एच एस प्रणय आपापले उपान्त्य फेरीतले सामने आज खेळणार आहेत. सायनाचा सामना चीनी तैपेईच्या ताई जू यींग हिच्याशी, तर प्रणयचा सामना चीनच्या चेन लॉग सोबत होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात सायनानं दक्षिण कोरियाच्या ली जँग मी हिचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव केला, तर प्रणयनं कोरियाच्या सॉन वॅन याचा १८ - २१, २३ - २१, २१ - १२ असा पराभव केला. किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

//*********//

No comments:

Post a Comment