Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
किडींच्या प्रादुर्भावामुळे
झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी राज्य सरकारनं अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला
आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव बिजय कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही
माहिती दिली. नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं सुमारे
३४ लाख हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झाल्याचं, सरकारनं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं
आहे.
****
झोपडपट्टीधारक ज्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत, त्यांना
मालकी हक्काचे पट्टे देण्याचा
निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर
इथं आज झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, त्यावेळी
ते बोलत होते. शहरातल्या झोपडपट्टीधारकांना एक लक्ष मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या
एक मे रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन होणार आहे. या कार्यक्रमाची
रंगीत तालिम आज करण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभाग, पोलिस दल यांच्यासह विविध
शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार
जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आज पुण्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची तर खजिनदारपदी हेमंत
टकले यांची निवड करण्यात आली आहे.
****
परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघातून शिवसेनेनं
अकोल्याचे आ़मदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर
केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया
यांना दिला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
****
बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा नजिक आज कार आणि ट्रकचा अपघात
होऊन दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. धुळ्याहून अकोल्याला जाणाऱ्या कारला समोरुन येणाऱ्या
ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी देतांना ते जलवाहिनीतून
देणं आवश्यक असल्यातं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. दि
इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर आणि सिंचन सहयोग यांच्या वतीनं आज औरंगाबाद इथं आयोजित 'सिंचन
आणि समन्यायी पाणी वाटप जायकवाडी प्रकल्प' या परिसंवादाचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. फुलंब्री धरणातलं पाणी शेतकऱ्यांना जलवाहिनीद्वारे देण्यात
येणार असून, या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत
हे पाणी देण्यात येणार असून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे हे पाणी वापराचयं आहे, असं बागडे
यांनी सांगितलं.
****
पंढरपूर शेगाव पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी
तोडलेल्या झाडांच्या लिलावातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी
ही माहिती दिली. या महामार्गामुळे उद्योगधंदे, व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन,
या भागाच्या विकासाला चालना मिळेल, परिणामी, परतूर तसंच मंठा तालुक्याचा कायापालट होईल,
असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांचं पद महापौर
नंदकुमार घोडेले यांनी, एका दिवसासाठी निलंबित केलं आहे. स्थायी समितीचे सभापती गजानन
बारवाल यांना आज मनपाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करण्यास विरोध करणाऱ्या या तीन नगरसेवकांनी
अंदाजपत्रकाच्या प्रती फाडून, त्या सभापती आणि महापौरांच्या अंगावर भिरकावल्या. त्यानंतर
महापौरांनी ही कारवाई केली. या गोंधळानंतरही स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी
सभागृहात एक हजार ४७५ कोटी ८७ लाख ३० हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या
ऐतिहासिक अवशेषांची ओळख करून घेण्यासाठी आज औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे हेरिटेज
वॉक आयोजित करण्यात आला होता. इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, डॉ. बिना
सेंगर, आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिवाकांत वाजपेयी यांनी तत्कालीन मराठा आणि मुघल
राजकारण आणि स्थापत्याबद्दल माहिती दिली. इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी
उपस्थित होते.
****
सर्बिया इथं झालेल्या ५६ व्या
बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुमित संगवान, निकहत
झरीन, आणि हिमांशू शर्मा यांनी सुवर्ण पदक पटकावली आहेत. आता पर्यंत
भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्य
पदकं जमा झाली आहेत.
//************//
No comments:
Post a Comment