▼

Wednesday, 18 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.04.2018 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

****

·      कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे विद्युत पुरवठा करण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.

·      विनाअनुदान आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरच्या मान्यताप्राप्त पात्र खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान देण्याला मान्यता.

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांची घोषणा.

·      नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय तसंच समर्थकांच्या निवासस्थानांवर पोलिसांचे छापे.

आणि

·      राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.

****

राज्यातल्या कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे विद्युत पुरवठा करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार मार्च २०१८ अखेर शुल्क भरलेल्या दोन लाख २४ हजार ७८५ कृषिपंपांना अखंड आणि योग्य दाबानं वीजपुरवठा केला जाणार आहे.

उच्चदाब वितरण प्रणालीमुळे विद्युत हानी, अपघात आणि रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होईल, त्याचबरोबर रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होईल आणि अनधिकृत वीज जोडणी घेता येणार नाही. मार्च २०१८ पर्यंत शुल्क जमा केलेल्या आणि प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत जोडणी दिली जाणार आहे.

विनाअनुदान आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदांसाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ अशा १२ महिन्यांसाठी ६४ कोटी ९८ लाख रूपयांचं अनुदान देण्यासदेखील मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. राज्य शासनानं जुलै २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना हे अनुदान दिलं जाणार आहे. सध्या २० टक्के अनुदान या शाळांना देण्यात येत आहे.

चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यापुरती राबवण्यात येणार आहे.

****

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारां’ची काल घोषणा करण्यात आली. ४० व्यक्ती आणि ११ संस्थांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या डॉ.धनंजय हंगे, स्वप्नील चंदने, निरंजन भाकरे, मंगल साळूंखे यांचा, जालना जिल्ह्यातल्या शाहीर नानाभाऊ परिहार, बीड जिल्ह्यातल्या खान अब्दूल रशिद आणि तत्वशील कांबळे यांचा, लातूर जिल्ह्यातल्या अजिनाथ शेरकर, तर नांदेड जिल्ह्यातल्या मारोती पवार यांचा समावेश आहे. संस्थांतर्गत पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण विकास संस्था आणि नांदेड जिल्ह्यातल्या राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे.

****

नागरी भागात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय तसंच समर्थकांच्या निवासस्थानांवर काल पोलिसांनी छापे घालून झडती घेतली. पुणे, मुंबई, नागपूर आणि गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात काल सकाळी पुणे पोलिसांच्या नेतृत्वाखालच्या विविध पथकांनी हे छापे घातले. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांशी सबंधांवरून काही कार्यकर्त्यांची चौकशीदेखील केली. त्यांच्याकडील लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल आदीसारख्या दळणवळणाच्या साधनंही तपासण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण करणाऱ्या नागपूरच्या एका वकिलाच्या घरावरही छापा घालण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचराकोंडी आणि कचरा व्यवस्थापनात महापालिकेला आलेलं अपयश, याचा निषेध करण्यासाठी ‘औरंगाबाद कनेक्ट टीम’ या सर्वसामान्य नागरिकांच्या संघटनेनं काल औरंगाबाद महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांच्या निवेदनासह महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातला कचरा भेट देण्यात आला. कचरा प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचं आश्वासन महापौरांनी यावेळी दिलं, तर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी येत्या ३० एप्रिलपर्यंत शहरातला कचरा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेनं नऊ जागा निश्चित केल्या असून या जागांना सनियंत्रण समितीनं मान्यता दिली असल्याचं आणखी शपथपत्र काल महापालिकेच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलं. मात्र या जागांची निवड कायमस्वरूपी आहे की तात्पुरती याबाबत उल्लेख नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर न्यायालयानं यासंदर्भात स्पष्टीकरण देणारे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

****

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. काल सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. सातारा जिल्ह्यात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात भिंत अंगावर पडून एक जणाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे, रायगड, शिर्डीसह जुन्नर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार इथं गारांचा पाऊस झाल्यामुळं तोडणीस आलेल्या कांदा आणि टोमॅटो पीकाचं मोठं नुकसान झालं आहं. मराठवाड्यातही काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. लातूर इथंही पाच वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. शहरातल्या ठाकरे चौकात वाऱ्यानं दोन झाडे पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काही भागातला वीज पुरवठा बंद होता. उदगीर तालुक्यातल्या गायमाळ तांडा इथं अंगावर वीज पडून एक जणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. केज परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीच्या जागेचे बनावट दस्तावेज तयार करून, व्यापारी गाळे बांधून लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी नगर पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ८ नगरसेवकांसह ३६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकत्याच्यावतीनं न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गैरव्यवहार प्रकरणात सहभागींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

केंद्र सरकारच्यावतीनं पंतप्रधान एलपीजी पंचायतचं आयोजन करण्यात येत असून, या योजनेअंतर्गत सात प्रवर्गात मोडणाऱ्या कुटुंबांना अवघ्या शंभर रूपयात घरगुती वापराची गॅसजोडणी देण्यात येणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचे सहाय्यक विक्री अधिकारी कौशल खंडेलवाल यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली. येत्या २० एप्रिल रोजी देशात उज्ज्वला दिवस साजरा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मानवी विकास निर्देशांक वाढीसाठी प्रत्येक बालकाला दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, असं लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी म्हटलं आहे. उदगीर इथं आयोजित तालुकानिहाय निर्धार सभेत ते काल बोलत होते. शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य सूर्यकांत मोहरीर यांचं काल अंबाजोगाई इथं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष, परळीच्या वैद्यनाथ देवस्थानचे संचालक, आदी पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मोहरीर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

संपूर्ण कृषी कर्जमाफी, तसंच मराठवाड्यासाठी एक लाख घरकुलं, आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतमालाला किफायतशीर भाव, बोंडअळीची नुकसान भरपाई, खरिपासाठी पाणी नियोजन आदी मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.

****

कठूवा आणि उन्नाव इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी गंगाखेड बंद पाळण्यात आला. यावेळी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.

****

परभणी महापालिकेचे आयुक्त राहूल रेखावार यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.

****

परभणीतल्या ब्रॉस बॅण्ड कलावंतानी आपल्या विविध मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. या कलावंतांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर केलं.

****

No comments:

Post a Comment