▼

Friday, 13 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक - पोस्को कायद्यात सुधारणा करण्यावर भर देऊ, असं आश्वासन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी दिलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आश्वासन दिलं.

****

मुंबईत इंदू मिल इथं उभारण्यात येणारं भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्मारकाच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. हे काम कालबध्द पध्दतीनं होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचं ते म्हणाले.

****

राज्य सरकारच्या २३ मार्च रोजीच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार येत्या तीन महिन्यांत प्रशासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र नागरिकांनी आपल्याकडच्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तुंची एका महिन्याच्या मुदतीत विल्हेवाट लावावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. भविष्याचा विचार करता पर्यावरण संवर्धन, महत्त्वाचं असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं.

****

नांदुर मधमेश्वर कालव्यातून सिंचनासाठी पुरेशा पाण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तसंच गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी औरंगाबाद इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आंदोलकांच्या विविध मागण्यांचं निवेदन आमदार प्रशांत बंब, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, आमदार सुभाष झांबड यांच्या शिष्टमंडळानं महामंडळांच्या कार्यकारी संचालकांकडे सादर केलं. सुमारे दोन पूर्णांक ५६ अब्ज घनफूट पाण्याचं दोन समान टप्प्यात आवर्तन देणं, तसंच नांदूर मधमेश्वर कालव्यासाठी संपादित जमिनीचा सरळ खरेदीद्वारे मोबदला देण्याची मागणी प्रशासनानं मान्य केल्याची माहिती आमदार बंब यांनी दिली.

****

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलस्वयंपूर्ण गावांच्या संख्येत भर पडल्याचं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या जुई धरणात सुरू असलेल्या कामाची आज शिंदे यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी, ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

***

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मौजे चौंडी या जन्मगावी जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारण्यात येणार असून, या कामासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष वितरित करण्यात आला आहे.

****

समाधान शिबिराच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन तालुक्यांचा येत्या १९ एप्रिल रोजी परभणी इथं गौरव करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज गंगाखेड इथं समाधान शिबिराच्या कामकाजाचा आढावा घेताना ही माहिती दिली.

****

ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आज तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं. कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियानं सुवर्ण पदक जिंकलं. ९७ किलो वजनी गटात मौसम खत्रीनं, तर ५७ किलो वजनी गटात पुजा धानदानं रौप्य पदक तर ६८ किलो वजनी गटात दिव्या काकरन हीनं कांस्य पदक जिंकलं. टेबलटेनिस मध्ये महिला दुहेरी मनिका बात्रा आणि मौमा दास जोडीनं रौप्य पदक पटकावलं. त्याआधी आज सकाळी नेमबाजीत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं आणि अनिश भानवालानं सुवर्ण पदक, तर अंजुम मौदगिलनं रौप्य पदक जिकंलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १७ सुवर्ण, दहा रौप्य आणि बारा कांस्य पदकांची कमाई केली आहे.

****

मराठवाड्यात आज सर्वात जास्त ३९ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ३८ पूर्णांक पाच, तर औरंगाबाद इथं ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीचा बाह्यरुग्ण विभाग उद्या बंद राहणार आहे. तर परवा रविवारी हा विभाग सुरु राहणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment