Monday, 7 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 7 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे  २०१ दुपारी १.०० वा.

****



 उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाभियोगाचा हा प्रस्ताव सर न्यायाधीशांविरोधात असल्यामुळे वरीष्ठ न्यायमूर्ती या याचिकेवर सुनावणीचे निर्देश देऊ शकतात असं सांगून, काँग्रेस नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी, या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. खटल्यांच्या सुनावणी बाबत संविधान खंडपीठानं यापूर्वीच निर्णय दिला होता आणि सर न्यायाधीशांसमोर ही याचिका दाखल करावी, असं न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी सांगितलं. सर न्यायाधीशांविरोधात कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार किंवा अक्षमता सिद्ध करणारे पुरावे नसल्यानं उपराष्ट्रपतींनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला होता.

****



 तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि कौशल्य विकास भारताच्या विकासासाठी महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून त्यांनी आज कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचं महत्त्व विषद केलं. सुमारे एक लाख युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या युवकांसाठी राज्यात सुसज्ज अशी साठ बीपीओ संकुलं आणि जागतिक दर्जाची क्रीडा संकुलं उभारण्याची भाजपची योजना असल्याचं सांगितलं.

****

 माजी मुख्यमंत्र्यांना पद सोडल्या नंतरही सरकारी निवासस्थानांमध्ये राहण्याची परवानगी देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कायद्यात संशोधन करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्यात करण्यात आलेलं संशोधन असंवैधानिक असून, यामुळे समानतेच्या सिद्धांताचं उल्लंघन होत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक पदातून मुक्त होते, तेव्हा ती सामान्य जनते प्रमाणेच असते, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश मधल्या या कायद्या मध्य करण्यात आलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती. 

****



 अभिनेता सलमान खान आज जोधपुर जिल्हा आणि सत्र न्यायालयसमोर हजर झाला. दोन काळविटांची शिकार केल्या प्रकरणी जोधपूरच्या सत्र  न्यायालयानं सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, त्या आदेशाला त्यानं आव्हान दिलं आहे. न्यायाधीश चंद्रा कुमार सोनगरा यांनी या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या १७ जुलैला ठेवली आहे. पुरेसा पुरवा नसल्यानं, या प्रकरणातले सह आरोपी, अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं होतं.  

****



 अहमदनगर मधल्या केडगाव इथल्या दु्हेरी हत्या कांडानंतर दोन दिवसांनी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, यासंदर्भात आज नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश रत्नपारखी यांनी ही माहिती दिली. या सर्वांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

****



 राज्यात कोयना धरणापासून रखडलेलं विस्थापीतांचं पुनर्वसन करणं हे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीसमोर मोठं आव्हान असल्याचं या समितीचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटलं आहे. पुणे इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. ६८ वर्षांपासून विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून, विस्थापित झालेल्यांची संख्या सुमारे ५५ लाख असल्याचं भांडारी यांनी सांगितलं.

****



 श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या दक्षिण आशियायी कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल शेवटच्या दिवशी अव्वल स्थान कायम राखत २० सुवर्ण, २२ रौप्य आणि आठ कांस्य पदकं पटकावली. ट्रिपल जंप प्रकारात मुलींच्या गटात प्रियदर्शिनी सुरेशनं १२ पूर्णांक ९० शतांश मीटरच्या विक्रमासह, तर मुलांच्या गटात कमलराजनं १५ पूर्णांक ९६ शतांश मीटर विक्रमाची नोंद करत सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक स्पर्धेत संजना चौधरीनं ४८ पूर्णांक आठ शतांश मीटरचा विक्रम करत, तर गोळाफेक स्पर्धेत आशिष भालोथियानं १८ पूर्णांक ५३ शतांश मीटरचा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत पदकतालिकेत यजमान श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर तर  पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत सात देश सहभागी झाले होते.

****



 झेक प्रजासत्ताकामध्ये पिल्सन इथं सुरू असलेल्या ग्रां प्री ऑफ लिबरेशन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेमबाजीमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटात गगन नारंग आणि पूजा घाटकर या जोडीनं रौप्य पदक पटकावलं. एअर पिस्टलच्या मिश्र प्रकारात निवेथा परमानन्थम आणि अमनप्रीत सिंग यांनीही रौप्य पदक जिंकलं.

*****

***

No comments:

Post a Comment