Tuesday, 8 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी एका आरोपीला काल औरंगाबाद इथून अटक

Ø विधानपरिषद निवडणुकीत 'लातूर उस्मानाबाद बीड' मतदार संघात दुरंगी; तर 'परभणी हिंगोली' मतदार संघात तिरंगी ढत

Ø सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून सायबर समिती स्थापन

Ø एमपीएससी परीक्षेत बनावट परीक्षार्थी प्रकरणी नांदेड इथं आणखी आठ आरोपींना अटक

आणि

Ø जालना जिल्ह्यात वॉटर ग्रीड योजनेत जलवाहिनी टाकण्याचं काम जून महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश

*****



 मुंबईतल्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी एका आरोपीला काल औरंगाबाद इथून अटक करण्यात आली. इरफान कुरेशी असं त्याचं नाव असून, तो नुकताच सौदी अरबस्थानातून औरंगाबाद इथं आला होता. सोळा वर्षांपूर्वी २००२ साली घाटकोपर पश्चिम इथं एका बसमध्ये झालेल्या या स्फोटात चार जण ठार आणि ३२ जण जखमी झाले होते.

****



 लातूर उस्मानाबाद बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला. कराड यांनी नुकताच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या मतदारसंघातून काल पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भरतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे या दोन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.

****



 परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात, भाजप शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख आणि अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्या लढत होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार होते, मात्र नागरे मुदत संपल्या नंतर अर्ज मागे घेण्यास पोहोचले, त्यामुळे त्यांना अर्ज मागे घेता आला नाही. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले प्रफुल्ल पाटील आणि सुशील देशमुख यांनी काल अर्ज परत घेतले.

****



 पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसतर्फे विश्वजित कदम यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं कदम यांना पाठिंबा दिला आहे. पतंगराव कदम यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली आहे.

****



 नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार आहे. काल अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे, तसंच, विकास आघाडीचे परवेज कोकणी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****





 दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपाही वनगा कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.

****



 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालय, आणि विविध संस्था संघटनांनी सूचवलेल्या निवडणूक सुधारणांबाबत राजकीय पक्षांसोबत संवाद साधणं आवश्यक आहे, असं मत, राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी व्यक्त केलं आहे. राज्य घटनेतल्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित राजकीय पक्षांच्या कार्यशाळेत ते काल मुंबईत बोलत होते. राज्यघटनेतल्या या दुरुस्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळाली, आणि या संस्थांच्या निवडणुका वेळेवर होत आहेत, असं सहारिया म्हणाले.

****



 राज्यातल्या विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल लोकशाही दिनात बोलत होते. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****



 सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगानं सायबर समिती स्थापन केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. राज्याचे माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी ही समिती, अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारला लवकरात लवकर सादर करेल. या समितीची पहिली बैठक आज होणार आहे.

****



 अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोहचवण्यासाठी, महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये  नव्यानं १०० ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यास केंद्रीय  महिला, आणि बाल कल्याण मंत्रालयानं काल मंजुरी दिली. राज्यात वर्धा इथं असं केंद्र स्थापन करण्यात येईल. या केंद्रात महिलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, पोलिस सहायता, मानसिक तसंच सामाजिक समुपदेशन आदी सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससी परीक्षेत बनावट परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकानं काल नांदेड इथून आणखी आठ आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या ३४ जणांना झाली आहे. हे प्रकरण किनवट न्यायालयात सुरू असल्यानं, या सर्वांना किनवट न्यायालयात हजर करण्याचे आदेश नांदेड न्यायालयानं दिले

****



 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, येत्या तीन जूनला होणाऱ्या प्राथमिक परीक्षेसाठी, परीक्षार्थींना प्रत्यक्ष प्रवेशपत्र मिळणार नसून, संकेतस्थळावरुन त्याची प्रत प्राप्त करून घ्यावी लागणार आहे. आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे काल ही माहिती दिली. प्रवेश पत्रावरचं छायाचित्र अस्पष्ट असेल किंवा उपलब्धच नसेल, तर उमेदवाराला दोन एकसारखी छायाचित्रं आणि आधार पत्र, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र किंवा पारपत्र यापैकी एक पुरावा हमीपत्रासह, सादर करावा लागणार आहे. 

****



 जालना जिल्ह्यात परतूर, मंठा आणि जालना तालुक्यात समाविष्ट १७६ गावांसाठी ग्रीड पद्धतीनं पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी टाकण्याचं काम जून महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जलवाहिनी जाळे - वॉटरग्रीड योजनेसंदर्भात, काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचनाही लोणीकर यांनी दिल्या. दरम्यान, जालना तालुक्यातल्या पाष्टा इथल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसाला, जाहीर मदतीपैकी उर्वरित तीस हजार रुपयांचा धनादेश, पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते काल देण्यात आला.

****



 परभणी जिल्ह्यातल्या जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी, येलदरी, सिध्देश्वर या मोठ्या प्रकल्पांमध्ये आजघडीला शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या २२ लघुप्रकल्पांपैकी १४ प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. निम्नदुधना प्रकल्पातून परभणी शहराची पेयजलाची मागणी पूर्ण केली जात आहे. निम्नदुधना प्रकल्पात सध्या सुमारे ३७ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

****



 दरम्यान, परभणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून आज पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावं, शेतकऱ्यांनी आपली जनावरं नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी विद्युत मोटारीद्वारे उपसा करु नये, असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****



 आळंदीचं विश्वशांती केंद्र आणि पुण्याच्या माईर्स एमआयटी संस्थेचे प्रयागअक्का कराड पुरस्कार काल जाहीर झाले. कवयित्री मंदा नाईक, उषा जोगळेकर, भाषा तज्ज्ञ भिक्षुणी संघमित्रा, सामाजिक कार्यकर्त्या मंगल शहा, आणि संत साहित्याच्या अभ्यासक डॉ झुल्फी शेख यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुवर्णपदक, अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या शनिवारी लातूर जिल्ह्यात रामेश्वर रुई इथं हे पुरस्कार प्रदान केले जातील.



****



 जनसंपर्क, माध्यम आणि संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी औरंगाबाद इथले  माध्यम तज्ज्ञ डॉ. वि. ल. धारुरकर यांना, भारतीय जनसंपर्क संस्थेच्या वर्धा शाखेचा जनसंपर्क पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्धा इथं झालेल्या कार्यक्रमात वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्राध्यापक आनंद वर्धन शर्मा यांच्याहस्ते धारुरकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****



 अहमदनगरमधल्या केडगाव इथल्या दु्हेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आज नऊ जणांना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

*****

***

No comments:

Post a Comment